अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावेळी गोरक्षक काय करत होते ? : ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात राज्यातही गोरक्षकांनी अनेकांना संशयावरून बेदम मारले आहे, पण गुजरात राज्यातील अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी गोळीबार करून ठार मारले, तेव्हा हे सर्व गोरक्षक काय करीत होते ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "गोरक्षकांचे करायचे काय ?" या मथळ्याखाली लिहलेल्या 'सामना'तील अग्रलेखात ठाकरे यांनी गोरक्षकांर टीकेची झोड उठवली आहे.
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावेळी गोरक्षक काय करत होते ? : ठाकरे

मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात राज्यातही गोरक्षकांनी अनेकांना संशयावरून बेदम मारले आहे, पण गुजरात राज्यातील अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी गोळीबार करून ठार मारले, तेव्हा हे सर्व गोरक्षक काय करीत होते ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "गोरक्षकांचे करायचे काय ?" या मथळ्याखाली लिहलेल्या 'सामना'तील अग्रलेखात ठाकरे यांनी गोरक्षकांर टीकेची झोड उठवली आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, "गोरक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी देशभरात जो हैदोस घातला आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही टीका सहन करावी लागत आहे. कथित गोरक्षक ही दुकानदारी असून त्यांची गय केली जाणार नाही असा दम भरूनही गोरक्षकांचे थैमान थांबलेले नाही. महाराष्ट्रापासून देशाच्या अनेक भागांत गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुसलमानांवरील हल्ले व हत्यासत्र सुरूच आहे आणि या अमानुष कृत्याचे समर्थन कुणालाच करता येणार नाही. अबू आझमी सारख्यांना अशी चिथावणीखोर भाषा वापरण्याची संधी देणारे आपणच आहोत, पण गोरक्षणाचे भूत मानगुटीवर बसलेल्यांना हे समजवणार कोण ? " असा खेदही ठाकरे व्यक्त करत ठाकरे म्हणतात, " गोमांसावरून हिंदू व मुसलमानांतील झगड्याने टोक गाठले तर ते पाकिस्तानला हवेच आहे आणि या झगड्याचा फायदा घेऊन ते दंगली व घातपात घडवू शकतात. सीमेवर आधीच तणाव आहे. त्यात देशांतर्गत असा वणवा पेटला तर ते परवडणारे नाही," असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात," गोवंश हत्याबंदीचा कायदा काही राज्यांत झाला आहे, पण अनेक राज्यांत गोमांस हे त्यांचे रोजचे खाणे आहे. गोव्यात भाजपचे राज्य आहे, पण तिथे गोमांसावर बंदी नाही. केरळ व ईशान्येकडील राज्यांत गोमांस हे रोजचे अन्न आहे व तेथील भाजपच्या मंत्र्यांनीच गोमांस चवीने खात असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मंत्र्यांनाही गोरक्षक धोपटून काढणार आहेत काय ? भ्रष्टाचाराचा जो कायदा आहे त्यानुसार पैसे घेणाऱ्याइतकाच पैसे देणाराही दोषी ठरतो. मग आता गोमांस विकणाऱ्यांबरोबर गोमांस खाणाऱ्यांनाही फासावर लटकवले जाणार आहे काय ?" एका माणसाला एकटे गाठून ४०-५० जणांचा जमाव बेदम मारहाण करतो व कायदा बघ्याची भूमिका घेतो हे धक्कादायक आहे. दिल्लीपासून नागपूरपर्यंत हे घडते. यामागे एखादे षड्यंत्र आहे काय ? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. 

ठाकरे पुढे लिहतात, "देशात सध्या माणसाच्या आयुष्यापेक्षा गाय आणि बैलाच्या आयुष्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले असले तरी गेल्या तीन वर्षांत गोमांसाची निर्यात वाढली आहे व त्यातून हिंदुस्थानला मोठे परकीय चलन मिळाले आहे. मग हा पैसा देशाच्या विकासकामासाठी वापरण्याचा अपराध पंतप्रधान मोदी यांनी करू नये असेच गोरक्षकांना सांगायचे आहे काय ? देशात सध्या हिंदू विचारांचे राज्य असले तरी हे तालिबान्यांचे किंवा इराणच्या खोमेनींचे राज्य नाही. अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचविणारा एक सलीमच होता. काश्मीरातील अतिरेक्यांच्या हल्ल्यात गेल्या चारेक महिन्यांत अनेक मुसलमान पोलीस शहीद झाले आहेत. गोरक्षक म्हणवून घेणाऱ्यांनी याचे भान ठेवले तर बरे होईल. कारण मुसलमानांचे पुढारी हाती शस्त्र घेण्याची चिथावणीखोर भाषा करीत आहेत. त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतील. पुन्हा अशा दुर्दैवी संघर्षात स्वतःला गोरक्षक म्हणवून घेणारे ठेकेदार कुठेच दिसत नाहीत. मग छातीवर वार झेलावे लागतात ते शिवसैनिकांना. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्हाला ते पार पाडावे लागते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com