mumbai news - Desai-Munde | Sarkarnama

देसाई यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांकडून एमआयडीसी जमीन घोटाळ्यासंदर्भात झालेल्या आरोपामुळे आज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नसल्याने उद्योगमंत्र्यांच्या या राजीनामानाट्यावर विरोधीपक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. 

मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर विरोधकांकडून एमआयडीसी जमीन घोटाळ्यासंदर्भात झालेल्या आरोपामुळे आज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नसल्याने उद्योगमंत्र्यांच्या या राजीनामानाट्यावर विरोधीपक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. 

मुख्यमंत्री हे भ्रष्ट उद्योगमंत्री देसाई यांचा राजीनामा न स्वीकारून त्यांना पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मंत्र्यांना कितीही वाचवले तरी आमचा भ्रष्टाचारी मंत्री आणि सरकारविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारही त्यांनी दिला आहे. 

विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मागील दोन आठवड्यांपासून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या घोटाळ्याचे पुरावे मांडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. काल अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मेहता यांची लोकायुक्‍ताकडून तर देसाई यांची स्वतंत्ररित्या आणि निष्पक्ष अशी चौकशी केली जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर देसाई यांनी आज आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला, मात्र तो राजीनामा स्वीकारण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दाखवली नसल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्र्याविरोधात टीका केली जात आहे. 

दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण रात्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सकाळी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा घेऊन गेलो होतो, परंतु त्यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही. चौकशी होईल तेव्हा, पाहू मात्र राजीनामा देण्याची आवश्‍यकता नसल्याचे आपल्याला सांगितले असल्याचे देसाई म्हणाले. 

या चौकशीत कागद पत्रे उपलब्ध करून देणे, साक्षी नोंदवणे ही कार्यवाही विभागाचे अधिकारी करणार आहेत, या अधिकाऱ्यांच्या बदलीचे, त्यांच्या चौकशीचे अधिकार, गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार त्या विभागाच्या मंत्र्यांना असतात, त्यामुळे हे मंत्री पदावर असताना त्यांच्या विभागाचे अधिकारी त्यांच्या विरुद्ध साक्ष काशी देऊ शकतील, कागदपत्रे कशी पुरावतील, म्हणजेच ही चौकशी निव्वळ फार्स ठरेल, निष्पक्षपतीपणे होऊ शकणार नाही, म्हणून हा प्रश्न निव्वळ नैतिकतेचा नाही. दबावविरहित चौकशीसाठी मंत्र्यांनी पदावरन दूर होणे आवशयक आहे. जे मंत्री मुख्यमंत्र्यांवर कारवाई टाळण्यासाठी इतका दबाव आणू शकतात, ते अधिकाऱ्यांना कधीही निष्पक्ष चौकशी करू देणार नाहीत, यामुळे मंत्र्यांचा राजीनामा घेऊनच त्याची चौकशी करावी, अशी मागणीही मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख