राजकारण्यांकडून "बोचलं म्हणून'चे फायद्यासाठी भांडवल - Mumbai news - Bochala Mhanun poem hits political circle | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारण्यांकडून "बोचलं म्हणून'चे फायद्यासाठी भांडवल

मयुरी चव्हाण काकडे 
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

व्हिडीओ मध्ये छेडछाड, बदल करून तो व्हायरल केला जाऊ नये. भविष्यात अनेक सामाजिक पैलू कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा माझा मानस आहे. 
- अंकुश आरेकर, कवी. 

कल्याण : सध्या सोशल मिडीयावर अंकुश आरेकर नावाच्या तरुण कवीची "बोचलं म्हणून' ही कविता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात या कवितेबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी माझ्या कवितेचं भांडवल करू नये, असे मत अंकुश आरेकर यांनी व्यक्त केले आहे. 

पुण्यात आयोजिलेल्या एका कार्यक्रमात अंकुशने सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. या कवितेत अंकुशने नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या भाष्यामुळे विरोधकांनी या कवितेला अक्षरशः डोक्‍यावर घेतले आहे. काहींनी त्याचे भांडवल करायला सुरुवात केली आहे. मात्र, एक कवी म्हणून मी सामाजिक विचारसरणीतून ही कविता मांडली. यामध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा पक्षाला टार्गेट करण्याचा आपला उद्देश नव्हता असेही त्याने स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर कवितेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाष्य केल्याचे कदाचित काहींना ते आवडणारही नाही. मात्र, यावर कवितेचा सहिष्णूपणे विचार करण्यात यावा, अशी अपेक्षा अंकुशने व्यक्त केली. कविला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून त्याची मतं, मनातील खदखद तो कवितेतून व्यक्त करू शकतो असे अंकुशने सांगितले. राजकीय उद्देशाने नाही तर सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला ही कविता सुचल्याचे अंकुश म्हणाला. 

कार्यक्रमात कवीता सादर करताना त्याचे शूटिंग होत आहे, याची कल्पना नव्हती. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली याची देखील कल्पना नव्हती. काही मित्रांनी सोशल मीडियावरील कविता पाहून अभिनंदन करण्यासाठी फोन केले तेव्हा "बोचलं म्हणून' या कवितेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समजले आणि अंकुशला सुखद धक्का बसला. त्यानंतर अंकुशचा फोन खणखणायला प्रारंभ झाला आणि मेसेज बॉक्‍सवरही कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. 

मूळचा सोलापूरचा असलेला अंकुश सध्या पुणे येथे राजशास्त्राचे शिक्षण घेत आहे. कविता प्रसिद्ध झाल्यावर लगेचच अंकुशची परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे एकीकडे चाहत्यांचे येणारे फोन व मेसेज आणि दुसरीकडे अभ्यास यांचा ताळमेळ साधताना त्याची चांगलीच तारेवरची कसरत झाली. तरीही अभ्यासातून थोडा वेळ काढून आलेले फोन आणि मेसेजची दखल आनंदाने आपण घेत असल्याचे अंकुश सांगतो. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख