पत्नीची चौकशी झाली अन् संजय राऊत म्हणतात, मला माहितीच नाही!

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या अखेर आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी सुरू आहे.
shivsena leader sanjay raut says i did not know about wife ed inquiry
shivsena leader sanjay raut says i did not know about wife ed inquiry

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना आधी तीन वेळा समन्स बजावण्यात आले होते. अखेर त्या एक दिवस आधीच आज चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाल्या. यावर संजय राऊत यांनी पत्नीची चौकशी झाल्याचे माहिती नसल्याचा दावा केला आहे. 

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. ईडीने नुकतीच प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित 72 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. 

या प्रकरणी वर्षा राऊत यांना तीन वेळी समन्स बजावण्यात आले होते. अखेर त्यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. एक दिवस आधीच आज त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतून वर्षा राऊत यांना मिळालेल्या पैशाच्या कागदोपत्री पुराव्यांची विचारणा ईडीने केली. 

दरम्यान, पत्नीच्या चौकशीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला तुमच्याच माध्यमातून कळाले की वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या. मी घरी गेल्यावर याबाबत माहिती घेईन. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसल्यामुळे सगळी माहिती दिली जाईल. मी आधी स्पष्ट केले आहे की सरकारी कागदाचा मान ठेवला जाईल. आम्ही कायद्याने काम करणारी माणसे आहोत. आम्ही संपूर्ण सहकार्य करू. 

आमची शक्ती आहे पण ती दाखवण्याची ही वेळ नाही. वर्षा राऊत या खंबीर आहेत. त्या वर्षा संजय राऊत आहेत, त्यामुळे त्यांना रिसीव्ह करायला जायची गरज नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.  

पीएमसी बॅंकेतील 4 हजार ३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक राकेश वाधवा, सारंग वाधवा, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील ९५ कोटी एचडीआयएलमार्फत प्रवीण राऊत यांनी इतर ठिकाणी वळविल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. 

या पैशातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहारानंतर एक कोटी ६० लाख प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी राऊत यांना दिले होते. त्यातील ५५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्‍शन कंपनीत भागीदार असल्याचे ईडीने म्हटले आहे.

शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकून सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरुन शिवसेना नेते भाजपवर चांगलेच संतापले होते. नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावली होती. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ईडीच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकार लक्ष्य करीत आहेत, असा आरोप होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com