प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेबच हवेत; प्रभारींसमोर काँग्रेस आमदारांचा आग्रह

काँग्रेसमध्ये अतिशय वेगाने संघटनात्मक फेरबदल सुरू आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
congress mlas demand balasaheb thorat should continue as state president
congress mlas demand balasaheb thorat should continue as state president

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल अतिशय वेगाने सुरू आहेत. महाराष्ट्रात प्रदेशध्यक्ष बदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांच्यासमोर अनेक आमदारांनी बाळासाहेब थोरात यांनाच प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, विदर्भातील आमदारांनी पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडल्याचे चित्र आज दिसले. 

आज सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत बहुतांश काँग्रेस आमदार हजर होते. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज आमदारांची मते ऐकून घेतली. मुंबईचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रदेश संघटनेकडे लक्ष देण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला आहे. आजच्या भेटीगाठी हा त्याच मोहिमेचा भाग होता. राज्यात विधिमंडळ नेतेपदी मात्र नवा नेता नेमला जाण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जवळपास सुमारे ८० टक्के आमदारांनी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना प्रदेशाध्यक्ष बदलणे पक्षासाठी योग्य नसल्याची भूमिका मांडली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी गेल्या काही महिन्यांत पुढे आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यावर लगेचच निवडणूक आणि कोविडची साथ आल्याने त्यांची कारकिर्द अर्धवट संपवणे योग्य  नसल्याचेही सांगण्यात आले. 

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी लावून धरणाऱ्या १० ते १ ५ आमदारांमध्ये विदर्भातील नेत्यांचा समावेश होता. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. मात्र, यातील प्रत्येकाचा दुसऱ्याच्या नावाला विरोध असल्याने थोरात यांच्या पाठीशी हे नेते उभे आहेत. 

काँग्रेसमधील संघटनात्मक व नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिणाऱ्या 23 नाराज नेत्यांसोबत पक्ष नेतृत्वाने काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अखेर पक्षाच्या इच्छेनुसार काम करण्याची तयारी दर्शविली. यामुळे राहुल गांधी हे पुन्हा अध्यक्षपद स्वीकारतील, अशी अटकळ बांधली जात आहे. या महत्वाच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये वेगाने चक्रे फिरू लागली आहेत. आता महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांत संघटनात्मक फेरबदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com