प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कुणीही घेऊ द्या...पण बदलायचा नसेल तर तसं सांगा! - congress leader balasaheb thorat demands urgent decision for mpcc president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कुणीही घेऊ द्या...पण बदलायचा नसेल तर तसं सांगा!

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलासाठी  लागत असलेल्या विलंबाबाबत बाळासाहेब थोरातांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. प्रदेशाध्यक्षाबाबत पक्षाने लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लावून धरली आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणे अवघड बनल्याची कबुलीही त्यांनी दिली असल्याचे समजते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी आता सोनिया गांधींनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील नेत्यांशी या संदर्भात कालच (31 जानेवारी) चर्चा केली. या चर्चेत नाना पटोले यांच्या नावावर चर्चा झाली. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात आहे मात्र, त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबत सार्वजनिक बांधकाम अथवा ऊर्जा मंत्रालयाची मागणी केली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना दुहेरी जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. या अनुषंगाने सोनिया गांधींनी राज्यातील काँग्रेसच्या आठ वरिष्ठ मंत्र्यांशी दिल्लीत चर्चा केली. 

प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी लागत असलेल्या विलंबाबाबत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी पदावरुन पायउतार होण्यास तयार आहे. प्रदेशाध्यक्षपद बदलायचा असेल तर कुणीही ती जबाबदारी घ्यावी. पक्षाला जर बदल करावयाचा नसेल तर मला माहिती द्या. अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणे अतिशय अवघड बनले आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा वेळी राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर भर द्यायला हवा, अशी भूमिका थोरात यांनी घेतल्याचे समजते.  

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल असले तरी राज्यातील नेत्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव लावून धरले आहेत. पटोले यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी ते मंत्रिपदासाठी अडून बसल्याने अंतिम निर्णयाला विलंब लागत आहे. याबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी या घेणार असून, उद्या (ता.2) याची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

पक्षाचे विदर्भातील नेते पटोले यांच्या बाजूने नाहीत. राज्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरा असलेले विदर्भातील नेते विजय वडेट्टीवर यांच्या मागे विदर्भातील नेते उभे आहेत. याचवेळी अशोक चव्हाण आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे वडेट्टीवार यांच्या बाजूने आहेत. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पटोले यांच्या बाजूने झुकलेले आहेत. यामुळे अंतिम निर्णय सोनिया गांधी याच घेतील. उद्या पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख