सचिन वाझे इफेक्ट : मुंबईतील 727 पोलिस अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी - Soon 727 officers of Mumbai Police will be transferred | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझे इफेक्ट : मुंबईतील 727 पोलिस अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी

उत्तम कुटे
मंगळवार, 29 जून 2021

सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक व पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

पिंपरी : मुंबई पोलिस दलात (Mumbai Police Force) वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेमुळं आता इतर अधिकाऱ्यांनाही झटका बसणार आहे. केवळ मुंबईच नव्हे तर नवी मुंबई, ठाणे व पुणे पोलिस दलातील हजारो पोलिस अधिकाऱ्यांची उचलबांगली करण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये सर्वाधिक 727 अधिकारी एकट्या मुंबई पोलिस दलातील आहेत. सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक व पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. (Soon 727 officers of Mumbai Police will be transferred )

पोलिस दलात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे व पुणे ही मोक्याची शहरं मानली जातात. या शहरांत आठ वर्षे व त्यापेक्षा अधिका काळ ठाण मांडून बसलेल्या तीन श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या सबंधित शहराबाहेर बदल्या करण्यात येणार आहेत. टर्म पूर्ण होऊनही हे अधिकारी राजकीय आश्रयामुळे एकाच ठिकाणी वर्षानूवर्षे काम करीत आहेत. त्यात मलईच्या जागांवर व त्यातही गुन्हे शाखेत (क्राईम ब्रॅंच) ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱ्यांना तेथून शहरातच दुसरीकडे हलविण्याचेही धाडस आतापर्यंत झालेले नव्हते. 

हेही वाचा : भाजपमध्ये दुफळी; प्रदेशाध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष पेटला

वाझे प्रकरणानंतर आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांत आठ वर्षे व त्यापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादीच सबंधित पोलिस आयुक्तांकडून डीजी पांडे यांनी मागवली आहे. तसेच बदलीसाठी पसंतीच्या तीन ठिकाणे (जिल्हे) देण्याची संधीही त्यांना देण्यात आली आहे. त्यात त्यांचे मूळगाव असलेल्या जिल्ह्यातही त्यांना बदली मागता येणार आहे. या बदल्या लगेच होणार असून त्याची प्रक्रिया उद्यापासूनच सुरु केली जाणार आहे. यामध्ये 727 अधिकारी मुंबईतील आहेत. तर अन्य तीन शहरांतील अधिकाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. 

दरम्यान, मुंबईतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची हफ्तेवसूली, मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ (अॅन्टिलिया) उभी करण्यात आलेली स्फोटकांची मोटार या खळबळजनक घटनांत संशयित म्हणून वाझेला अटक झाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील आणखी काही एपीआय पकडले गेले.

परिणामी, मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली. त्यामुळे प्रथम मुंबईचे त्यावेळचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांची बदली झाली. राज्यातील ज्येष्ठ आय़पीएस अधिकारी पातळीवरही मोठा खांदेपालट झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही जावे लागले. त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे दिलीप वळसे-पाटील आले. तशाच प्रतिमेचे प्रामाणिक अधिकारी संजय पांडे पोलिस महासंचालक (डीजी) झाले. 

हेही वाचा : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तेवीस गावांबाबत अजितदादांचा मोठा निर्णय

त्यानंतर आता पीएसआय, एपीआय व पीआयवर प्रथमच संक्रात आली आहे. परिणामी यातील दुखावलेले काही जण मॅटमध्ये (राज्य प्रशासकीय लवाद) जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकदम सगळ्या अनुभवी अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या होणार असल्याचा फटका मोठी गुन्हेगारी असलेल्या या चार महत्वाच्या शहरांतील गुन्हे तपासाला काहीशी खीळ बसण्यात होणार आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली होणाऱ्या शहरात पुणे असले, तरी पिंपरी-चिंचवड नाही. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. कारण हे पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन जेमतेम तीन वर्षेच झालेली आहेत.त्यामुळे तेथे कृष्णप्रकाश व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईत खंड प़डण्याची भीती नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख