API अश्विनी बिद्रे यांचा खून झालेल्या फ्लॅटमध्ये कुरूंदकर राहत होता का, याचे उत्तर मिळाले..

घरमालकाची साक्ष महत्वाची ठरली..
API अश्विनी बिद्रे यांचा खून झालेल्या फ्लॅटमध्ये कुरूंदकर राहत होता का, याचे उत्तर मिळाले..
Ashwini bidre

पनवेल : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे (APS Ashwini Bidre) यांची ज्या फ्लॅटमध्ये हत्या झाली, त्या मुकुंद फ्लाझा इमारतीमध्ये अभय कुरुंदकर (ABhay Kurundkar) राहत होता, तसेच त्याने एप्रिल २०१६ मध्ये आपल्या परवानगीशिवाय फ्लॅटमध्ये रंगकाम करून घेतल्याची साक्ष मुकुंद फ्लाझा इमारतीचे मालक कुमार नारायण घरत यांनी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान दिली. त्यामुळे कुरुंदकर त्या फ्लॅटमध्ये राहत नव्हता, हे सिद्ध करण्याचा आरोपीच्या वकिलांचा प्रयत्न फोल ठरला.

अभय कुरुंदकर याने तो राहत असेलल्या मुकुंद फ्लाझा इमारतीतील ४०१ या फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी फ्लॅटचे रंगकाम करून घेतले होते. मात्र कुरुंदकर या फ्लॅटमध्ये राहातच नव्हता, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याच्या वकिलाकडून शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयात करण्यात आला. मात्र मुकुंद फ्लाझा इमारतीचे मालक कुमार नारायण घरत यांनी त्या फ्लॅटमध्ये कुरुंदकर राहत होता, फ्लॅटचे भाडे कर्डिले हा पोलिस आपल्याला देत होता, अशी साक्ष दिली. तसेच आपण कुरुंदकर याला भाडेकरार करून घेण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याने करारनामा करण्यास टाळले होते, असेही सांगितले.

त्याचप्रमाणे अश्विनी बिंद्रे हार्मिनिक बिल्डिंगमधील बी ५०१ मध्ये जुलै २०१५ पासून राहण्यास होत्या, तसेच त्यांनी मार्च २०१६ पर्यंतचे भाडे माझ्या खात्यावर ऑनलाईन जमा केले होते. मात्र एप्रिल २०१६ पासून त्यांचे भाडे न मिळाल्याने आपण अश्विनी बिद्रे यांना वारंवार फोन केले, पण त्यांचा फोन बंद येत होता. जून २०१६ मध्ये आपण ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये जाऊन अश्विनी यांचे वडील जयकुमार बिद्रे यांचा फोन नंबर घेऊन त्यांना संपर्क साधला व विचारणा केली होती, अशी साक्ष अश्विनी बिद्रे राहत असलेल्या कळंबोलीतील फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी यांनी न्यायालयासमोर दिली.

शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्यासमोर टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉन, कुरुंदकर राहत असलेल्या इमारतीचे मालक कुमार नारायण घरत, त्याचप्रमाणे अश्विनी बिद्रे राहात असलेल्या फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी या तिघांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली. या वेळेस विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, राजू गोरे, एसीपी संगीता शिंदे अल्फान्सो, आरोपी आणि आरोपीचे वकील हजर होते. पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार असून आरोपींना वेळेत म्हणजे १०.३० पर्यंत न्यायालयात हजर करावेत यासाठी न्यायालयाने जेल प्रशासनाला लेखी आदेश दिले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in