गुड न्यूज : कोरोना लस घेण्यासाठी आता मनोरुग्णांना ओळखीच्या पुराव्याची गरज नाही - maharashtra government will vaccinate mental illness patients without id proof | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

गुड न्यूज : कोरोना लस घेण्यासाठी आता मनोरुग्णांना ओळखीच्या पुराव्याची गरज नाही

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

मुंबई : राज्यात कोरोना (covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (covid vaccination) भर दिला आहे. राज्यातील मनोरुग्णांना (mental illness) आता कोणत्याही ओळखपत्राविना (Id proof) कोरोना लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्याच आठवड्यात ओळखपत्रासह मनोरुग्णांना लस देण्यास ठाणे आणि रत्नागिरी मनोरुग्णांलयांमध्ये सुरवात करण्यात आली होती. 

याविषयी बोलताना आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. संध्या तायडे म्हणाल्या की, मनोरुग्णांना कोरोना लस देण्यास उद्यापासून (ता.19) सुरवात होणार आहे. यासाठी त्यांच्या ओळखपत्राच्या पुराव्याची आवश्यकता असणार नाही. यात वृद्धाश्रम, पुनर्वसन केंद्रे, भटके, भिकारी आणि इतर ओळखीचा पुरावा नसलेल्या व्यक्तींना लस दिली जाईल. 

राज्यात 4 मनोरुग्णालयांमध्ये 2 हजार 453 रुग्ण आहेत. यातील 41 रुग्णांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. यात 30 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर या चार मनोरुग्णालयांमध्ये 1 हजार 386 पुरुष आणि 1 हजार 67 महिला आहेत. 

या मनोरुग्णालयांमध्ये आतापर्यंत 7 हजार 253 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्यातील 763 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. यातील 78 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आतापर्यंत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, 141 सक्रिय रुग्ण आहेत. मानसिक विकार असलेल्या रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा नियम पालन करायला लावणे हे कठीण आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : लस घेणे होणार सोपे..को-विन पोर्टल आता तुमच्याच भाषेत 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व रुग्णांना लस देण्यास सुरवात झाली. आता चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख