mumbai-nalasopara-police-seizes-10-countrymade-pistols | Sarkarnama

नालासोपारा स्फोटके प्रकरण : सोलापूर येथून 10 गावठी पिस्तुलसह शस्त्रसाठा जप्त 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) स्फोटकांसह अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत वाढ केली. सोलापूर येथून 10 गावठी पिस्तुलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सुधन्वा सुधीर गोंधळेकर याने हा साठा लपवल्याची माहिती एटीएसने दिली.

मुंबई : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) स्फोटकांसह अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत वाढ केली. सोलापूर येथून 10 गावठी पिस्तुलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सुधन्वा सुधीर गोंधळेकर याने हा साठा लपवल्याची माहिती एटीएसने दिली.

स्फोटकांप्रकरणी एटीएसने शुक्रवारी वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर यांना अटक केली. त्यातील गोंधळेकरच्या चौकशीनंतर 10 गावठी कट्टे, एक एअर गन, 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार करण्यात आलेली पिस्टल बॉडी, सहा पिस्टल मॅगझीन, तीन अर्धवट तयार मॅगझीन, सात अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, 16 रिले स्विच, सहा वाहनांच्या पाट्या, एक ट्रीगर मॅकनिझम, एक चॉपर व एक स्टील चाकू हे साहित्य जप्त करण्यात आले. 

याशिवाय, अर्धवट तयार शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हॅण्ड ग्लोज, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटांबाबत हॅण्डबुक, एक्‍प्लोसिव्ह व मोबाईल प्रिंट आऊट, रिले स्विच सर्किट ड्रॉईंग पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड आदी साहित्यही जप्त करण्यात आले होते. ही शस्त्रे सोलापूर येथील माळशिरस तालुक्‍यातील नातेपुते गावातील एका व्यक्तीच्या घरातून जप्त करण्यात आल्याचे एटीएसच्या वतीने शनिवारी न्यायालयात सांगण्यात आले. 

याशिवाय आरोपींनी एकमेकांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. त्याबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी एटीएस प्रयत्नशील आहे. 

दरम्यान, संशयितांकडून जप्त करण्यात आलेली स्फोटके कमी क्षमतेची होती. त्यांचा वापर एखादा मोर्चा किंवा जमावावर केला जाण्याचा संशय होता.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख