सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : अनिल देशमुख - truth may be upset but not defeated said anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : अनिल देशमुख

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशनात केली होती. त्यावरून मी एसआयटी गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नागपूर : मला मिडीयाच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडून आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय आकसापोटी सुरू आहे. मी गृहमंत्री असताना मधल्या काळात काही महत्वाचे मोठे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असू शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सीबीआय व ईडीच्या माध्यमातून होत आहे. पण एक आहे, ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही’, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. 

अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो. तेव्हा अनेक योग्य निर्णय मी घेतले. यात प्रामुख्याने सीबीआयची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल तर राज्य सरकारच्या परवानगीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबर २०२० ला गृह विभागाने निर्णय घेतला की, सीबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक राहील. महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक राज्यांनी महाराष्ट्र सरकारप्रमाणेच निर्णय घेतला. 

त्यानंतर दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशनात केली होती. त्यावरून मी एसआयटी गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून योग्य तपास सुरू केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असू शकते. त्यामुळेच सीबीआय आणि ईडीमार्फत माझी चौकशी सुरू असण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने मी सीबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले, त्याच पद्धतीने ईडीलासुध्दा सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : राज्यात आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच लस मिळणार..

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईचा निषेध करताना नवाब मलिक म्हणाले, ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल करणे हे राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठीचे कारस्थान आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने या कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे.

सत्तेचा गैरवापर करून बदनामी करण्यासाठीच हे कारस्थान असल्याची टीका ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. तर, हे निव्वळ घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय यंत्रणांचा वापर करून घाणेरडे राजकारण करतेय. आघाडी सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. परंतु, कायदेशीर बाबींच्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील, असे मलिक यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख