एका नेत्याने चक्रे फिरवली आणि साई संस्थानची तयार झालेली यादी रखडली... - list of members of sai sanstha put on hold due to one leader | Politics Marathi News - Sarkarnama

एका नेत्याने चक्रे फिरवली आणि साई संस्थानची तयार झालेली यादी रखडली...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 जून 2021

नियुक्ती झाली म्हणून फटाकेही वाजले... 

मुंबई ः राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (NCP) आग्रहासमोर झुकत शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या (Shirdi Sai Mandir) अध्यक्षपदावरील दावा कॉँग्रेसने सोडून दिल्याने निश्चित झालेली यादी एका बड्या नेत्याच्या विनंतीमुळे थांबली आहे. हा नेता महाविकास आघाडीतील नसून बाहेरचा असल्याची चर्चा आज उच्चपदस्थ वर्तुळात होती. उच्च न्यायालयात याबाबत काल सुनावणी झाली. त्या वेळी सरकारने 15 दिवसांची मुदत नियुक्तीसाठी मागून घेतली होती. तोपर्य़ंत आमदार आशुतोष काळे यांच्या समर्थकांनी ते अध्यक्ष झाले म्हणून फटाकेही फोडले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील महामंडळ वाटपात नक्की काय ठरते आहे, याची उत्सुकता आहे.

शिर्डीबाबत केलेल्या त्यागामुळे कॉँग्रेसला पंढरपूर देवस्थान आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाचे प्रमुखपद मिळाले होते; मात्र बुधवारी (ता. २२) रात्री उशिरा एका बड्या नेत्याने काही काळ थांबण्याची विनंती केल्याने मंत्रालयात यासंबंधातील निर्णय कागदावर आला नाही. यासाठीची अधिसूचना तयार होती. नावांवरही शिक्कामोर्तब झाले होते. फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी राहिलेली होती. त्यात सारी सूत्रे फिरली. 

शिर्डी संस्थानाचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या मिर्लेकर यांच्याकडे सोपवून कॉँग्रेसने एक अतिरिक्त सदस्यपद मिळवले होते. कॉँग्रेसने शिर्डीचे प्रमुखपद प्रतिष्ठेचे केले नव्हते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कुणाहीसाठी शब्द टाकण्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले नव्हते, असे एका संबंधिताने स्पष्ट केले; मात्र बुधवारी यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतर तयार झालेली यादी मागे ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार आशुतोष काळेंचे समर्थकही यादी नंतर जाहीर करण्याच्या या निर्णयामुळे बुचकळ्यात पडले आहेत, असे समजते. ते प्रमुख होणार हे निश्चित झाल्याने आनंदोत्सवाची तयारी झाली होती.

दरम्यान, सिडको आणि म्हाडा या दोन महामंडळांचे प्रमुखपद अद्यापही वादाचा विषय आहे. अन्य महामंडळांवरील नियुक्त्यांची यादी मार्गी लागल्यानंतर हा तिढा सोडवला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधात महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करतील, असे समजते.

शिर्डी साई संस्थान सदस्य (संभाव्य यादी)
राष्ट्रवादी काँग्रेस
आशुतोष काळे
जयंत जाधव 
महेंद्र शेळके
सुरेश वाबळे
संदीप वर्पे
अनुराधा आदिक

काँग्रेस
डॉ एकनाथ गोंदकर
डी पी सावंत
सचिन गुजर
राजेंद्र भोतमागे
नामदेव गुंजाळ
संग्राम देशमुख

शिवसेना
रवींद्र मिर्लेकर
राहुल कनाल
खा. सदाशिव लोखंडे
रावसाहेब खेवरे (एक नाव प्रलंबित)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख