Mumbai Municipal Corporation election Shiv Sena BJP Devendra Fadnavis Narendra Modi | Sarkarnama

युतीचे धनुष्य ताणू नका; भाजप नेतृत्वाचा सूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आगामी व्यूहरचनेबाबत तब्बल तासभर बंदद्वार चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यांतील निकालांची सविस्तर व प्रत्येक जिल्हा परिषद महापालिकानिहाय माहिती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना दिली. मुंबईतील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेशी युती करणे भाजपला आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी ठामपणे मांडल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आगामी व्यूहरचनेबाबत तब्बल तासभर बंदद्वार चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यांतील निकालांची सविस्तर व प्रत्येक जिल्हा परिषद महापालिकानिहाय माहिती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना दिली. मुंबईतील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेशी युती करणे भाजपला आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी ठामपणे मांडल्याची माहिती आहे. राज्यातील किमान पाच जिल्हा परिषदांत भाजपला सत्ता मिळवायची तर शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य असल्याचीही वस्तुस्थितीही त्यांनी मांडली. 

याबाबतचा प्रत्यक्ष निर्णय हा महापालिकेतील शक्तिपरीक्षणाच्या दिवशी (ता. 9 मार्च) प्रत्यक्ष सभागृहातच होणार असल्याने तोवर दोन्ही पक्ष पत्ते उघडणार नाहीत व माध्यमांच्या कल्पनाविलासाला मुक्त वाव देतील, असे चित्र दिसत आहे. 

विश्‍वसनीय भाजप सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांनी फडणवीस यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर "पार्टी के लिए जो योग्य और उचित होगा, वो कीजिए', असा "ग्रीन सिग्नल' मुख्यमंत्र्यांना दिला. मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत काहीही बोलणार नाही, असे फडणवीस यांनी पत्रकारांना वारंवार सांगितले. मुंबईत महापौर कोणाचा होणार? शिवसेनेचा का? अशा प्रश्‍नांवर त्यांनी, "भाजपशी अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही,' असे सावध उत्तर दिले. मात्र, शिवसेनेबरोबरचे राज्यातील आपले सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा आत्मविश्‍वास त्यांच्या देहबोलीतून पुन्हा जाणवला. राज्यातील सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असली तरी, फडणवीस यांना त्याबाबत कसलाही तणाव जाणवत नसल्याचेही त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते.

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या निकालांनंतर "सकाळ'ने मुख्यमंत्री आगामी तीन चार दिवसांत दिल्लीला येतील, असे वृत्त दिले होते. फडणवीस आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीत पोचल्यावर तडक "7- एलकेएम' (लोककल्याण मार्ग) या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोचले. तेथे ते तब्बल दीड तास होते. त्यांच्याआधी एका राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना राज्यातील निकालांची विस्ताराने माहिती दिली. या भरघोस यशाबद्दल मोदी यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. मात्र, मुंबईत भाजपच्या आणखी जागा आल्या असत्या तर "सोने पे सुहागा' ठरले असते, असेही हसतहसत सांगितल्याचे समजते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेण्याचा फडणवीस यांचा मनोदय होता; मात्र शहा हे आज व उद्या (ता. 1) मणिपूर व उत्तराखंडच्या दौऱ्यावर असल्याने फडणवीस दुपारनंतर मुंबईत परतले. 

मुंबईतील सत्ता व महापौरपदाचे गूढ कायम असतानाच फडणवीस यांनी मोदी यांना तेथील परिस्थितीबाबत माहिती दिली. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ वर्तुळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांबद्दल कटुतेची भावना आहे. भाजप मुख्यालयातील एखाद्या नेत्याशी बोलतानाही ती लपत नाही. मात्र, शिवसेनेशी भाजपची युती ही सर्वांत जुनी असून, ती वैचारिक आधारावर आहे. त्यामुळे ती तुटू देऊ नये, असा सूर दिल्लीतून सातत्याने आळविला जातो. शहा यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या आवारात पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना, मुंबईचा निकाल काहीही लागला तरी शिवसेनेशी असलेली वैचारिक युती कायम राहील, असे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेतही भाजपने मुंबईत युती केली नाही तर ज्या पक्षापासून भाजपला देश मुक्त करायचा आहे, त्या कॉंग्रेसलाच मोकळे रान मिळेल, अशी भावना व्यक्त केल्याचे समजते. 

एकत्र येण्यावाचून पर्याय नाही 
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील निवडणुका निकालांची तपशीलवार आकडेवारी आणि "व्हिजन 2019' आपण मोदी यांना सादर केले. मुंबईत भाजप व शिवसेनेला असा कौल मिळाला आहे, की मुंबई व राज्यातील जिल्हा परिषदांत पहिल्यांदाच सत्ता मिळविण्यासाठी त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय दिसत नाही, अशीही भावना त्यांनी मांडल्याचे समजते. पंतप्रधानांनी त्यांचा युक्तिवाद ऐकून घेताना चार युक्तीच्या गोष्टीही त्यांना सांगितल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख