Mumbai Municipal corporation bye election | Sarkarnama

मुंबई महापालिकेत पोटनिवडणुकीच्या शक्‍यतेमुळे 'ते' चौघे हवालदिल !

समीर सुर्वे
बुधवार, 15 मे 2019

चार नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवरील उमेदवाराला विजयी घोषित करणे अपेक्षित असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्यामुळे या चार जणांना हादरा बसला आहे.

मुंबई  : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिल्यामुळे मुंबईतील शिवसेनेच्या तीन आणि कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचे धाबे दणाणले आहे. चार नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवरील उमेदवाराला विजयी घोषित करणे अपेक्षित असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्यामुळे या चार जणांना हादरा बसला आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील चार जागांसह राज्यभरातील 20 प्रभागांतील पोटनिवडणुकीच्या प्राथमिक कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी या प्रभागांची मतदार यादी अद्ययावत करण्याबरोबरच इतर प्राथमिक कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिका, नगरपालिकांना दिले आहेत.

मुंबईत जात पडताळणीत एखाद्या नगरसेवकाचे पद रद्द झाल्यावर निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जात होते. आता मुंबई महापालिकेसह अन्य नगरपालिकांनी मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात केल्यामुळे दुसऱ्या क्रमाकांवरील उमेदवाराचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, हे निवडणुकीचे वेळापत्रक नसून; प्राथमिक कामे पूर्ण करण्याची सूचना असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रभाग अपात्र नगरसेवक दुसऱ्या क्रमाकांवरील उमेदवार
28 राजपती यादव (कॉंग्रेस) एकनाथ उंडले (शिवसेना)
32 स्टेफी केणी (कॉंग्रेस) गीता भंडारी (शिवसेना)
76 केसरबेन पटेल (भाजप) नितीन सलागरे (कॉंग्रेस)
81 मुरजी पटेल (भाजप) संदीप नाईक (शिवसेना)

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख