tukte cyclone
tukte cyclone

चक्रीवादळ गुजरातकडे सरकले : महाराष्ट्रात सहा जणांचा बळी

महाराष्ट्रातील धोका टळला...

मुंबई : तोत्के  (Tauktae) चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. (Cyclone Tauktae moves toward Gujrat)

या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. 

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाउस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाउस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली

२ हजार ५४२ बांधकामांची  पडझड

या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी 5 वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किमी प्रती तास इतका होईल पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ तासांत मुंबई उपनगरात १२० मिमी पेक्षा जास्त तर कुलाबा भागात १०० ते १२० मिमी पाउस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com