`एक नाही, दोन नाही तर ठाकरे मंत्रीमंडळातील सहा मंत्र्यांना CBI `निमंत्रण` पाठवणार...` - cbi would invite six ministers from thackeray govt warns kirit somaiyya | Politics Marathi News - Sarkarnama

`एक नाही, दोन नाही तर ठाकरे मंत्रीमंडळातील सहा मंत्र्यांना CBI `निमंत्रण` पाठवणार...`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

सोमैय्या यांची भविष्यवाणी खरी ठरणार? 

कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भयंकर भयभीत झाले आहेत. सचिन वाझेने दिलेल्या जबाबानुसार एफआयआरमध्ये परिवहनमंत्री अनिल परब यांचेही नाव आहे. एनढेच नाही तर ठाकरे सरकारमधील सहा मंत्री हे सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

ठाकरे सरकार हे पोलिस अधिकारी परमबीरसिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणत आहे. सीबीआयने रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु केली आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर पडतील. येत्या चार महिन्यांत ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील सहा सहकारी सीबीआरच्या दारात असलीत, असे माझे त्यांना खुले आव्हान आहे, अशा शब्दांत सोमय्या यांनी ठाकरे सरकारबद्दल भविष्यवाणी केली.

सोमय्या हे आज कल्याणमधील कोविड सेंटरची पाहणी करायला होते. यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारला हे आव्हान दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पण काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी दुसरा एक मंत्री लवकरच राजीनामा देणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

भातखळकर यांचाही हल्लाबोल!

दुसरीकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे व त्यांच्या अनेक नातलगांचे शिवसेनेशी घनिष्ठ संबंध आहेत. या नातलगांनी अनेक बेकायदा कृत्ये केल्याचा संशय आहे. त्यामुळे माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

भातखळकर यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडियो देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत माने यांचे शिवसेनेशी संबंध असल्याची कुजबूज होती. मात्र आता भातखळकर यांनीच थेट आरोप केल्याने यासंदर्भातील चर्चेला उधाण आले आहे. माने यांचे नातलग असलेले शिवसेनेचे नगरसेवक दांपत्य कोण, अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

माने यांचे अनेक नातलग शिवसेनेत असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच खुद्द सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी. कदाचित त्यातून सचिन वाझे यांच्याप्रमाणेच माने यांचे शिवसेना कनेक्शन व त्यामुळे त्यांच्यावर कोणीतरी मेहेरनजर दाखवली होती का हे देखील  उघड होईल, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने फोन करून घराबाहेर बोलविल्याप्रकरणी माने यांना अटक करण्यात आली आहे. माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण, सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती. तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता, असाही खळबळजनक आरोप भातखळकर यांनी केला आहे.  

तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्जे मिळाली त्यांच्याशी सुद्धा सुनील माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी करावी. कदाचित या कनेक्शनमधूनच माने यांच्यावर कोणी मेहेरनजर दाखवली होती का व त्यापोटी त्यांनी काही अन्य कृत्ये केली होती का हे देखील उघड होईल, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. खुद्द या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे हे देखील निलंबनकाळात शिवसेनेत होते. त्यामुळेच निलंबित असूनही त्यांचा पोलिस दलात पुर्नप्रवेश सुकर झाला व त्यांना `शंभर` नंबरी महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. असेच काहीसे माने यांच्याबाबत झाले का हे देखील तपासावे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख