दुर्दैव : एसटी कर्मचाऱ्यांवर आली भाजीविक्री, मजुरी अन् हमालीची वेळ!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून एसटी बंद आहे. त्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन २१ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ७५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के वेतन देण्यात आले. त्यानंतर जून आणि जुलैचे १०० टक्के वेतन बाकी आहे
ST Workers doint Peety Jobs for Earning
ST Workers doint Peety Jobs for Earning

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले असल्याने कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. कुणी पाणीपुरी विक्री करून तर कुणी कांदे, बटाटे विकून उपजीविका भागवत आहेत. शासनाने नुकतेच ५५० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे किमान थकीत वेतन मिळण्याची तरी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून एसटी बंद आहे. त्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन २१ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ७५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के वेतन देण्यात आले. त्यानंतर जून आणि जुलैचे १०० टक्के वेतन बाकी आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी काम मागत फिरत आहेत. काम मिळत नसल्याने अनेकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी, कांदे-बटाटे विक्री सुरू केली तर काहींनी भाजीपाला विक्री सुरू केली आहे. काहीजण चक्क मजुरी कामे करीत आहेत.

गावी जाऊन पाणीपुरी विक्री

सिल्लोड आगारातील वाहक गोपाल बोंडे यांनी कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पाणीपुरी विक्री सुरू केली आहे. बोंडे हे २०१२ मध्ये एसटीमध्ये भरती झाले. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने त्‍यांनी मूळ गावी मोतसावंगा (जि. वाशीम) येथे पाणीपुरी विक्रीला सुरवात केली आहे. घराच्या किरायाचे पैसे कसे देणार असा प्रश्न निर्माण झाल्याने थेट गावी आलो, आता पाणीपुरी विक्री करत असल्याने काही प्रमाणात तरी आधार मिळाल्याचे ते सांगतात.

कांदा मार्केटमध्ये मजुरी

पैठण आगारातील चालक मिथुन गायकवाड हे पाच वर्षांपासून एसटीच्या सेवेत आहेत. वडवळी (ता. पैठण) हे त्यांचे मूळ गाव आहे. वेतन थांबल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. घरामध्ये पत्नी, आई-वडिलांसह आठजणांचे कुटुंब आहे. त्यामुळेच पैठणच्या मोंढ्यातील कांदा मार्केटमध्ये कांदा भरण्याचे (मजुरी) काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभरात एक-दोन ट्रक लोड झाल्यानंतर चारशे ते सहाशे रुपये मिळत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजीपाला विक्रीची वेळ

पैठण आगारात चालक-वाहक असलेले गोकुळ पुरी हे तीन वर्षांपासून एसटीच्या सेवेत आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांची सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. घरामध्ये पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असे कुटुंब आहे. वेतन बंद झाल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी मूळ गावी म्हणजे भडजी (ता. खुलताबाद) येथील काटशेवरी फाट्यावर भाजीपाला विक्री सुरू केली आहे.

भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळास इतर राज्यांप्रमाणे अर्थसाहाय्य देऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने एसटी सेवा दत्तक घेतली पाहिजे - मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com