मुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे यांचे नाव आघाडीवर - IAS sitaram kunte ahead in race of chief secretary post | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्य सचिव पदासाठी सीताराम कुंटे यांचे नाव आघाडीवर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांची या नावाला संमती मिळणे आवश्यक

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यात कुंटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. परदेशी यांनीदेखील या पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोणाची निवड करणार, याकडे लक्ष राहणार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने तीनही पक्षांच्या संमती यासाठी घेतली जाईल, अशी शक्यता आहे. 

विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे पुढील दोन पदभार असणार आहे. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत नव्या मुख्य सचिवांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. संजयकुमार यांनी आठ महिने या पदावर काम केले. निवृत्तीनंतर ते राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष या पदावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना `महारेरा`वर जायचे होते. मात्र तेथे अजोय मेहता यांची नियुक्ती झाल्याने संजयकुमारांसाठी वीज नियामक आयोगाचा पर्याय उरला. आनंद कुलकर्णी यांच्या निवृत्तीनंतर नियामक आयोगाचे अध्यक्षपद हे चार जानेवारीपासून रिक्त आहे. 

कुंटे हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभागात कार्यरत आहेत. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेले कुंटे हे येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांनाही नऊ महिन्यांचा कार्यकाल मिळणार आहे. त्यांनी पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी, मुंबई पालिकेत उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयक्तु या तीनही पदांवर काम केले. तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. संजयकुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्तीच्या वेळीच कुंटे यांचेही नाव चर्चेत होते. संजयकुमार हे त्यांना वरिष्ठ असल्याने कुंटे यांचे नाव मागे पडले. या पदासाठी इच्छुक असलेले परदेशी हे देखील नोव्हेंबर 2021 मध्येच  निवृत्त होणार असल्याने त्यांनीही या पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

मुंबई पालिका आयुक्त म्हणून परदेशी यांची महाविकास आघाडी सरकारने कोरोनाकाळात तडकाफडकी बदली केल्याने ते नाराज होते. त्यांची नगरविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती सरकारने त्यानंतर केली. मात्र त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील जबाबादारी स्वीकारून त्यांनी मुंबई सोडली. ते पुन्हा राज्याच्या प्रशासनात परतण्यास इच्छुक आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यलायाची जबाबदारी परदेशी यांनी सांभाळली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख