मोठा निर्णय : आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ - state govt increases retirement age for health dept officers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मोठा निर्णय : आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय.. 

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास आज कार्योत्तर मान्यता देण्यात आली. तसेच    राज्याच्या साहसी पर्यटन धोरणासही मान्यता देण्यता आली. राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करण्यास मान्यता देण्यात आल्याने लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. (Cabinet decision on Health officers) 

आरोग्य खात्यात कोरोना काळात अधिकाऱ्यांची संख्या कमी असणे परवडणारे नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. मात्र त्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेण्यात आली नव्हती. ती आज घेण्यात आली. 

वाचा ही बातमी : म्हणून शरद पवार नाना पटोलेंच्या निशाण्यावर 

नोकरभरतीचा हा आहे मोठा निर्णय

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजरा 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट कची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील. संघ लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील श्री. भरणे यांनी यावेळी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख