नीलम गोऱ्हे म्हणतात, ``खुद्द शरद पवार काटेकोरपणे लक्ष ठेवून होते.... - Sharad Pawar himself was keeping a close eye says Neelam Gorhe | Politics Marathi News - Sarkarnama

नीलम गोऱ्हे म्हणतात, ``खुद्द शरद पवार काटेकोरपणे लक्ष ठेवून होते....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

अभ्यासू उपसभापती मिळाल्याची सभागृहाने व्यक्त केली होती भावना..

पुणे : विधीमंडळाच्या दोन दिवसांपूर्वी संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर नीलम गोऱ्हे यांची निवड करताना पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या. भाजपने या निवडणुकीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यांनी उमेदवारही जाहीर केला होता. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः काटेकोरपणे लक्ष ठेवून होते, असे खुद्द गोऱ्हे यांनी सांगितले आणि त्यांचे आभार मानले.

या निवडीबद्दल आभार मानताना गोऱ्हे यांनी थेट घडामोडी सांगितल्या नाहीत पण भाजपने काही डावपेच तर रचले नव्हते ना, अशी शंका त्यांच्या आभार पत्रावरून दिसते.

विधीमंडळ कामकाज समितीत ही निवडणूक घेण्याबाबत ठरलेले नव्हते, असा आक्षेप भाजपने घेतला होता. मात्र निवडणूक जाहीर झाल्याने भाजपने भाई गिरकर यांचा उमेदवारी अर्ज भरला. नियम डावलून निवडणूक घेतल्याचा आक्षेप व्यक्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल थेट नाराजी जाहीर करणारे पत्र लिहिले होते. ``तुम्हाला सभापती करण्यासाठी मी मतदान केले. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा राष्ट्रवादीला या निमित्ताने मतदान केले. ही मदत करूनही तुम्ही चुकीच्या पद्धतीने  उपसभापतिपदाची निवडणूक घेतली, अशा शब्दांत रामराजेंवर टीका केली होती. या निवडीसाठी अनेक आमदार उपस्थित नसल्याचा मुद्दा भाजपने केला होता. मात्र अखेरच्या क्षणी भाजपने उमेदवारी मागे घेऊन गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीबद्दल गोऱ्हे म्हणतात, ``विधान परिषद उपसभापती म्हणून परत एकदा माझी फेरनिवड करण्यात आली. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे नेते मंडळी यांनी माझ्या नावाची सहमती दिली आणि सभागृहांमध्ये ही बिनविरोध  निवड करण्यात आली. त्याबद्दल मी महाराष्ट्रातातील जनतेचे आभार मानते. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाच धडा दिला होता. त्यावर वाटचाल करण्याचा माझा हेतू राहील. या सर्व निवडणुकीवरती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार हे काटेकोर लक्ष देऊन होते. त्यांचे मी आभार मानते.

माझा वाढदिवस लवकरच आहे. कोणताही सभारंभ न करता सर्वांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील, अशी व्यवस्था आपण करु. त्या दूरध्वनीवरून अथवा व्हिडिओद्वारे आपण संवाद साधू. आपण सोशल डिस्टंन्सिंगचे  पालन करून आपण वाढदिवसासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी या निमित्ताने केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख