ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचे साताऱ्यात निधन  - Veteran actress Ashalata passes away in Satara | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचे साताऱ्यात निधन 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ मराठी आणि कोकणी नाटकांद्वारे केला होता. पुढे शंभरपेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारून अभिनयात आपली वेगळी वाट निर्माण केली. गुंतता ह्रदय हे, वाऱ्यावरची वरात या नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय 81) यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले. हिंगणगाव (ता. फलटण) येथील एका फार्म हाऊसवर "माझी आई काळुबाई' या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना आशालता यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना सातारा येथील प्रतिभा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

"आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील गाण्यांचे चित्रिकरण सुरू होते. त्यासाठी काही कलाकार मुंबईतून आले होते.

त्यातील तब्बल 27 कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही समावेश होता. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांच्यासह डॉक्‍टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.

मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल या त्यांच्यासोबत होत्या. मुंबईत कोरोनाचा संसर्ग जास्त असल्याने मुंबई बाहेर सातारा जिल्हा निवडण्यात आला होता.'' सर्व उत्तम रितीने चित्रिकरण सुरू असताना, एका गाण्याचा
चित्रिकरणासाठी मुंबईहून काही डान्सर्स आले होते. त्यांची कोव्हिड चाचणी न झाल्याने हा प्रकार झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. 

मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ मराठी आणि कोकणी नाटकांद्वारे केला होता. पुढे शंभरपेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारून अभिनयात आपली वेगळी वाट निर्माण केली. गुंतता ह्रदय हे, वाऱ्यावरची वरात या नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.

बासू चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिणीची माया या
मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविणाऱ्या ठरल्या. चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाला उजाळा देणारे ''गर्द सभोवती'' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख