गणेशोत्सवात कोकणात अखंड वीजपुरवठा : ऊर्जामंत्री डॉ. राऊत 

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Uninterrupted power supply in Konkan during Ganeshotsav: Energy Minister Dr. Raut
Uninterrupted power supply in Konkan during Ganeshotsav: Energy Minister Dr. Raut

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

महावितरणच्या फोर्ट स्थित कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज (ता. 11 ऑगस्ट) कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राऊत यांनी वरील आदेश दिले. 

मंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोकण विभागात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी येथेही वीज कपात न करता चोवीस तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. 

याचबरोबर, रोहा येथे 22 केव्ही स्वीचिंग उपकेंद्र करण्यासंदर्भात 2800 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, श्रीवर्धन तालुक्‍यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्‍यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्‍यकता आहे. तळा तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भौगोलिक दृष्ट्या मोठ्या शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी, असेही आदेश मंत्री डॉ. राऊत यांनी या वेळी दिले आहेत. 


कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची अँटीजेन चाचणी करा : शेट्टी 

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कोरोना चाचणीची सक्ती न करता त्यांची अँटीजेन चाचणी करावी, अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी शेट्टी यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे नुकतीच केली होती. त्यावर राज्य सरकारने मागणी केली तर अशी विशेष रेल्वे सोडण्याची तयारी गोयल यांनी दाखवली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्टच्या परिपत्रकानुसार विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची तयारी दर्शविल्याबद्दल शेट्टी यांनी सरकारचे आभार मानले आहेत. 

या प्रवासासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकीट हेच प्रवासाचा इ पास समजण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करण्याची किंवा मग कोकणात जाऊन 10 किंवा 14 दिवस क्वारंटाईन होण्याची अट आहे. मात्र, या रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रॅपीड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट करावी व ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशांना कोरोना स्वॅब चाचणीची सक्ती करू नये, तसेच त्यांना क्वारंटाईनदेखील करू नये, असे शेट्टी यांनी सुचवले आहे. 

तसेच 12 ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना स्वॅब चाचणी करायला लावू नये. त्यांनादेखील हीच रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सांगावे, ज्यायोगे त्यांना कोरोना चाचणीचा काही हजार रुपयांचा भुर्दंड पडणार नाही, असेही शेट्टी यांनी सुचवले आहे. कोकणात रहिवाशांची घरे लांब असल्याने तेथे एक प्रकारे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग पाळल्यासारखे होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वरील सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com