रामदास कदम फार दिवसांनी बोलले... पण शिवसेनेच्या मंत्र्याला फटकारले! - Shivsena leader speaks after long gap but targets party minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

रामदास कदम फार दिवसांनी बोलले... पण शिवसेनेच्या मंत्र्याला फटकारले!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

त्या पोलिस निरीक्षकावर कदमांचा राग 

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे सध्या शांत आहेत. शिवसेनेवर भाजपकडून एवढे हल्ले होत असताना ते फारसे प्रत्युत्तर देताना माध्यमांमधून दिसत नाहीत. आज विधान परिषदेत मात्र शिवसेनेच्याच मंत्र्याला त्यांनी लक्ष्य केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन रामदासभाईंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मिळवले. मात्र त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे असलेले गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले.

कदम यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविषयी देशमुख यांच्याकडे सभागृहात तक्रार केली. कोरोनाच्या काळात क्रिकेट सामन्यांसाठी परवानगी देणे आणि सरकारी अधिकारी असताना राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेचेच मंत्री पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप कदम यांनी सभागृहात केला. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी देशमुख यांना दिले होते. त्या आव्हानावर भाष्य न करता देशमुख यांनी चौकशीची आश्वासन दिले.

गृहमंत्र्यांचे हे पण आश्वासन 

वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना देशमुख बोलत होते. राज्यात ज्या ज्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे सांगून देशमुख म्हणाले, की ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख