समीर भुजबळ, पंकज भुजबळ हे चंद्रकांतदादांकडे चकरा मारत होते? - chandrakantdada Patil warns Chagan Bhujbal for criticizing BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

समीर भुजबळ, पंकज भुजबळ हे चंद्रकांतदादांकडे चकरा मारत होते?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

दोन नेत्यांत रंगला वाद

मुंबई : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांत कलगीतुरा रंगला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ यांना जामीन मिळविण्यासाठी त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा हे माझ्या बंगल्यावर तासनतास बसलेले असायचे, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी आज एका मुलाखतीत केला. त्याला भुजबळ यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर भुजबळ यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना जामीन लवकर मिळत नव्हता. त्यांना दीड ते दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. हा जामीन लवकर व्हावा यासाठी समीर आणि पंकज हे माझ्याकडे आले होते आणि समीर तर बंगल्यावर तासनतास बसत होता, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांनी जास्त बोलू नये, अन्यथा महागात पडेल, अशी टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. भाजपचा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालात धुव्वा उडाल्यानंतर देशात घरोघरी मोदीच्या विरोधात वातावरण आहे, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना  छगन भुजबळांनी  पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे ते म्हणाले.

यानंतर भुजबळ यांनीही त्यास उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती देखील ठेवायला हवी. दुर्दैवाने त्यांना वारंवार पराभवाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलायला हवं. आपला पुतण्या समीर भुजबळ याला दीड महिने आधी तुरूंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर कारवाई झाली. मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी गेला असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी हा कोणता पुतण्या काढला हे मला माहीत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला. 
पाटील यांची भाषा ही अरेरावीची आहे. भाजप लोकशाहीची पायमल्ली करत ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हातातील शस्त्र म्हणून वापरत आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे भुजबळ म्हणाले. लोकांवर खोट्या केसेस टाकणे, त्यासाठी यंत्रणा वापरणे भाजपकडून सुरु आहे. मात्र यावर बोलण्यात अर्थ नाही. माझ्या नजरेत चंद्रकांत पाटील यांनी तेवढी किंमत नाही, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी यावेळी केली.

भारी पडेल कसे ?
ते म्हणाले, चंद्रकांत पाटील `मला भारी पडेल` असे म्हणाले. सीबीआय, ईडी  या संस्थाचा सत्ताधारी उपयोग करतात असे मी ऐकल होत. माझे सगळे खटले सध्या न्यायालयात सुरु आहे. न्यायालयात सुरु असलेल्या माझ्या खटल्यांबाबत मला भारी पडेल म्हणजे काय?. आता न्यायालयाचे निर्णय देखील चंद्रकांत पाटील ठरवू लागले आहेत का ?. न्यायालयाचे निर्णय घेणारे हे कोण?. असा प्रश्न त्यांनी केला. या विषयावर मला जास्त चर्चा करायची नाही. एव्हढ्या मोठया पराभवामुळे ताण- तणाव येउ शकतात. अशा ताणतणावातून ते बोलले असावे. म्हणूनच मी म्हणतो की, त्यांनी आता ताण-तणाव पचवायची सवय करुन घ्यावी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख