सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचा लिलावच करा!: सचिन सावंत - Sachin Sawant Sarcastic comment on TV Media Live Telecast | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचा लिलावच करा!: सचिन सावंत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

एनसीबी सध्या बॉलिवूडमधल्या कलाकारांची चौकशी करत आहे. या चौकशी संदर्भातील सर्व माहिती बाहेर येत असून त्यांना कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, त्यांनी काय केलं, कोण रडले, अशी सर्वच माहिती बाहेर येत आहे. अशा चौकशीमुळे पुढच्या गुन्हेगारालाही कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आधीच तयारी करण्यास त्याला मदत होणार आहे, असा मुद्दा सचीन सावंत यांनी उपस्थित केला आहे

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीतून मिनिटा-मिनिटाची माहिती बाहेर येत असून ती प्रसारमाध्यमातून क्रिकेट कॉमेन्ट्रीसारखी ऐकविली जात आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशाच पद्धतीने चौकशी करायची असेल तर पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे 'आपदा मे अवसर' समजून आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाच्या हक्काचे लिलावच करून टाका. त्यातून सरकारच्या तिजोरीत काही पैसा तरी येईल, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे. 

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, एनसीबी सध्या बॉलिवूडमधल्या कलाकारांची चौकशी करत आहे. या चौकशी संदर्भातील सर्व माहिती बाहेर येत असून त्यांना कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, त्यांनी काय केलं, कोण रडले, अशी सर्वच माहिती बाहेर येत आहे. अशा चौकशीमुळे पुढच्या गुन्हेगारालाही कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आधीच तयारी करण्यास त्याला मदत होणार आहे. 

नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर पंतप्रधान केअर फंडात जमा झाली तेवढी रक्कम जमा झाली नाही तरी काहीतरी जमा होईलच. या सर्व प्रकरणांचा उपयोग भाजपाला बिहारच्या निवडणुकीत प्रचार करण्यासही उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल त्यामुळे भाजपाचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील, असे सावंत म्हणाले.

सरकारचे अपयश लपवणे आणि मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा गैर मुद्द्यांचा गाजावाजा केल्यास भाजपाला फायदा होतो. मुख्य समस्यांकडे जनता लक्ष देणार नाही त्यासाठी अशा प्रक्षेपणाचा फायदा होईल. असे सर्व फायदे पाहता सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा असा उपरोधीक सल्लाही सावंत यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख