ढिंग टांग : नाथाभाऊ आपने क्‍या खोया, क्‍या "पाया'? - Ekanath Khadse NCP Entry Dhing Tang Feature | Politics Marathi News - Sarkarnama

ढिंग टांग : नाथाभाऊ आपने क्‍या खोया, क्‍या "पाया'?

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

...नाथाभाऊ रागावतील, चिडतील, संतापतील, भडकतील, सटकतील, पण जाणार नाहीत अशी आमची खातरी होती. किंबहुना आम्ही पक्ष सहकाऱ्यांमध्ये पैजा लावायचो. नाथाभाऊ जाणार की राहणार, यावर मी चार वर्षे पैज जिंकत आलो, यावेळी मात्र हरलो!

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके निज आश्विन शु. षष्ठी.
आजचा वार : नमोवार...आय मीन गुरुवार!
आजचा सुविचार : तुम छोड चले हैं मेहफिल को, याद आये कभी तो मत रोना!
आजचा रंग : पिवळा!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) ओल्या दुष्काळाची ओली पाहणी करत असतानाच काल मला फोन आला. "नाथाभाऊ निघाले'! एवढेच सांगून त्या व्यक्तीने फोन ठेवला. खरे सांगतो, ऐकून माझे डोळेच ओले झाले! ओला दौरा संपवून ओल्या डोळ्यांनी परत आलो. नाथाभाऊंनी "मैं तो चला' असा एक ओळीचा मेसेज पाठवला म्हणे! त्यांना निदान चांगला "सेंड ऑफ' तरी द्यावा, असे मी आमचे अध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांना सुचवले होते. पण त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल, हे कारण सांगून सेंड ऑफ समारंभाला नकार दिला! असो!

किती प्रेमळ आमचे नाथाभाऊ! शेवटी "हो ना' करता करता निघून गेले! "जाऊ नका ना, नाथा' हे त्यांना मी स्वत: किती तरी वेळा सांगितले असेल. आमच्या गिरीशभाऊ महाजनसाहेबांनी तर त्यांच्या हजार मिनत्या केल्या असतील. शेवटी तर मा. चंदुदादांनी त्यांना "आपण बसून बोलू' असेही सुचवले. आता "बसून बोलू' याचा अर्थ उघड होता. इतके दिवस उभ्याने बोलत होतो, आता "बसून बोलू' याचा अर्थ "तुम्ही जाऊ नका' असाच होतो की नाही? (संदर्भ : चित्रपटगीत : चंदा रे चंदा रे...कभी तो जमींपर आऽऽ...बैठेंगे बातें करेंगे...') पण आमच्या नाथाभाऊंनी ऐकले नाही. ब्याग उचलली, हाताला घड्याळ लावले आणि निघाले!!

...नाथाभाऊ रागावतील, चिडतील, संतापतील, भडकतील, सटकतील, पण जाणार नाहीत अशी आमची खातरी होती. किंबहुना आम्ही पक्ष सहकाऱ्यांमध्ये पैजा लावायचो. नाथाभाऊ जाणार की राहणार, यावर मी चार वर्षे पैज जिंकत आलो, यावेळी मात्र हरलो! दरवेळेला नाथाभाऊ भेटले की त्यांची मी प्रेमाने चौकशी करायचो. इतकी की "माझ्या मागे चौकशा का लावता?' असे ते वैतागून म्हणायला लागले. भेटले की कायम म्हणायचे, "जातोच मी!' आम्ही त्यांना समजावायचो की, " नाथाभाऊ, अहो, येतो म्हणावे! जातो नाही!!' तरीही ते "जातोच', "खरंच जाईन हां!', "हा पहा, निघालो', "जाऊ का जाऊ?' अशा प्रेमळ धमकावण्या देत राहिले. शेवटी खरोखर गेले...गृहस्थ बेभरवशाचा!! जातो जातो सांगून चक्क गेलाच की!!

नाथाभाऊंनी हाताला घड्याळ बांधून ब्याग भरली, हे ऐकून मनाला किती यातना झाल्या, हे कसे सांगू? त्यांचे जाणे, अतिशय दुर्दैवी आहे. चाळीस वर्षांचे नाते चाळीस पैशाच्या मेसेजने संपले! कालपासून "तेरी गलियों मे ना रख्खेंगे कदम, आजके बाऽऽद' हे गाणे गुणगुणतो आहे. आवंढे गिळतो आहे. पण लोकांचा विश्वास नाही!

आमचे माजी मित्र मा. उधोजीसाहेबांनी " शिखरं पादाक्रांत करताना पायातले दगड का निखळताहेत, याचा विचार करा' असा सल्ला (मेसेज पाठवून) दिला आहे. त्यांना उत्तरादाखल "उलटा अंगठा' पाठवला आहे. आमचा पाया भक्कम आहे म्हणावे! सत्ता काय, आज नाही, उद्या आहे! माणसे येतील, जातील! पण मा. उधोजीसाहेब, इसमें तुमने क्‍या खोया, और क्‍या पाया?
-ब्रिटिश नंदी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख