खासदार डेलकर यांच्या काॅलेजवर कब्जा करण्याचा डाव होता? - Was it a ploy to capture MP Delkar's college is the question | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार डेलकर यांच्या काॅलेजवर कब्जा करण्याचा डाव होता?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 मार्च 2021

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली.

मुंबई : दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि डेलकर यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी मुंबईत आत्महत्या केली होती. यानंतर त्यांचे चिरंजीव अभिनव व त्यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या आधीच विधानसभेत हा मुद्दा चर्चेला आला असता डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केली.

या भेटीनंतर अभिनव डेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या वडिलांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्याला प्रफुल्ल के. पटेल हे कारणीभूत आहेत. ते दादरा नगर हवेलीचे प्रशासक आहेत. मागच्या 16 ते 18 महिन्यांपासून वडिलांना त्रास होत होता. माझे वडील 1989 पासून खासदार होते.  इतक्या कणखर माणसाला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले याचा अर्थ त्यांना किती मानसिक त्रासाला सामोर जावे लागले हे लक्षात येेते. दादरा व नगर हवेलीमध्ये प्रशासक हेच सर्वेसर्वा असतात. पटेलांनी माझ्या वडिलांना त्रास देताना कोणतीही कसर सोडली नाही. आमच्या कॉलेजमध्ये त्यांना खूप रस होता. त्यांना त्या काॅलेजवर कब्जा करायचा होता. त्यांनी आमच्याकडे मोठी रक्कम देखील मागितली होती. वडिलांना ब्लॅकमेलिंग केले गेले. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले,  असा दावा डेलकर यांच्या मुलाने केले.

वडिलांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मी वाचली आहे. त्यात अनेकांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आम्हाला केंद्राकडून कोणतीच मदत मिळाली नाही. एसआयटीकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आम्हाला न्याय नक्की मिळेल महाराष्ट्र सरकारवर आम्हाला विश्वास आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

विधानसभेत का झाला गदारोळ?

मुंबई : मनसुख हिरेन खून प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. तब्बल नऊ वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. हा गोंधळ थांबविण्यासाठी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात प्रमुख पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यात वाझे यांना निलंबित करण्याचे सर्व पक्षनेत्यांच्या बैठकीत ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वाझे यांना निलंबित करण्यास नकार दिला, असा घटनाक्रम पुढे आला आहे.

ही पण बातमी वाचा : मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी SIT

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी हा घटनाक्रम सांगितला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनातील चर्चा बाहेर सांगता येत नसल्याचा नियम स्पष्ट केला.

वाझे प्रकरणामुळे राज्यातील आजचे राजकारण तप्त झाले. वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता, हे देखील फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. वाझे यांच्यासोबत धनंजय गावडे यांचेही नाव त्यांनी विधानसभेत घेतले. गावडे यांच्या वसई-विरार परिसरातील निवासस्थानाजवळ मनसुख हिरेन यांचे लोकेशन आढळल्याचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता. गावडे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत.  

सचिन वाझे आणि हिरेन या दोघांत कसे संबंध होते आणि वाझे हेच कसे हिरेन यांच्यासोबत मृत्यूच्या आधी सोबत होते, हे फडणवीस यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख हे वाझे यांना का आणि कशासाठी वाचवत आहेत, असा सवाल त्यांनी केला. सचिन वाझे यांना अटक केली तर अनेक नावे बाहेर येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची दुपारी व्हिसीवरून बैठक झाली. त्यात वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख