बिहारचे आयपीएस अधिकारी क्वारंटाईन : मुंबई महापालिकेने केला हा खुलासा - BMC Clarifies Reasons to Quarantine Bihar IPS Officer | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारचे आयपीएस अधिकारी क्वारंटाईन : मुंबई महापालिकेने केला हा खुलासा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलीस अधिकाऱयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने अलगीकरण (क्वारंटाईन) केले आहे. त्यांना यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या नियमांनुसारच क्वारंटाईन करण्यात आल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पाटण्याहून मुंबईला आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या नियमांनुसारच क्वारंटाईन करण्यात आल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. क्वारंटाईनमधून सुट मिळण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करावा, असेही सांगण्यात आले आहे. 

आयपीएस अधिकारी विनय तिवारी काल पाटण्याहून मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांना बृहन्मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन केले आहे. याबाबत मुंबई महापालिका म्हणते.....

बिहारमधून मुंबईतील गोरेगांवमध्ये आलेल्या पोलीस अधिकाऱयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने अलगीकरण (क्वारंटाईन) केले, या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहेत. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.

.....बिहार राज्यातून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप ८ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेचे पथक काल (दिनांक २ ऑगस्ट २०२०) सायंकाळी सदर विश्रामगृहावर पोहोचले......

.......महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱया व्यक्तींसाठी लागू असलेली गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया व्‍यक्तींसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचा देखील समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यासोबतच, त्यांना माहिती देण्यात आली की, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची भूमिका सुरूवातीपासून संशयाची आहे. महाराष्ट्र सरकार काही गोष्टी जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवत आहे. या प्रकरणातले सत्य बाहेर येईल, या भितीनेच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख