मुंबईचे डबेवाले धावले पूरग्रस्तांच्या मदतीला : मदत पाहून अश्रू अनावर

मुंबईचे डबेवाले धावले पूरग्रस्तांच्या मदतीला : मदत पाहून अश्रू अनावर

कोल्हापूर : मुंबईच्या डबेवाल्यांनी संसार सेट भेट देऊन कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना सावरण्याचा प्रयत्न केला. पूरस्थितीतून सावरत असलेल्या आरे (ता. करवीर) येथे आज त्यांनी ही भेट दिली. परिसरातील गावांनाही भेट देऊन त्यांनी दिलेले किट पूरग्रस्तांच्या हाती पडल्यावर अनेक पूरग्रस्तांना अश्रू अनावर झाले.

मुंबईचे डबेवाले म्हणजे मॅनेजमेंट गुरू समजले जातात. मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. भल्याभल्यांनी त्यांच्याकडून मॅनेजमेंटचे धडे घेतले आहेत. याच डबेवाल्यांच्या कानावर कोल्हापुरातील पूरस्थिती पडली. मूळचे खेड तालुक्‍यातील असलेले आणि सध्या कोल्हापुरातील अग्निशमन दलात जवान असलेले भगवंत शिंगाडे यांनी ही माहिती डबेवाल्यांच्या संघटनेचे अध्यक्ष उल्हास शांताराम मुके यांना दिली. मुके यांनी तातडीने सर्व सदस्यांशी संपर्क साधला आणि मिळेल त्या वेळेत जीवनावश्‍यक वस्तू आणि निधी गोळा करायचे काम मुंबईत सुरू केले.

सचिव अर्जुन सावंत, सहसचिव कैलास शिंदे, बाळू भालेराव, खजिनदार जयसिंग पिंगळे, अर्जुन मेदगे, अशोक कुंभार, बारकू फापाले, दिलीप मरगज, आदित्य डांगले, मच्छिंद्र जगताप, मुरली आहेर, विनोद चोरगे, रामदास कणसे, लक्ष्मण टाकवे, ऋणाली पाटील, नवीन गुरव, दिलीप वीरेंद्र सिंह यांच्यासह 20 जणांची टीम दुपारी सायबर येथून निघाली. सायबरचे डॉ. प्रा. डी. एन. वळवी, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. सी. एस. दळवी, प्रा. सचिन जगताप, प्रा. कृष्णात चौगुले यांनी सहकार्य केले. 

आरे, आंबेवाडी, प्रयाग चिखली असा भाग त्यांना पूर्ण करावयाचा होता; मात्र सायंकाळ झाल्यामुळे आरे आणि आसपास असलेल्या गावांतील पूरग्रस्तांना त्यांनी भेटी दिल्या. जवळपास 200 हून अधिक पूरग्रस्तांना संसार सेट भेट दिले. आपल्या विशिष्ट पोशाखात आलेले हे डबेवाले आज पूरग्रस्त भागात चर्चेचे ठरले. कोल्हापुरातील कार्यकर्ते वसंत लिंगनूरकर हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.

पाच लाखांहून अधिकचे साहित्य 
डबेवाल्यांनी स्टेशनवर पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर रुपये गोळा केले. याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी डबे पोहोचवायला जातात, त्यांना विनंती करून जीवनावश्‍यक साहित्यही गोळा केले. तब्बल पाच लाखांहून अधिक असलेले हे साहित्य त्यांनी काल रात्री ट्रकमध्ये भरले आणि आज थेट कोल्हापूरकडे निघाले. पहाटे ते कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर सायबर येथील प्रा. वळवी यांच्याशी संपर्क साधला. तेथे आराम करून ते पुढे गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com