Mumbai dabbewalas are happy over Uddhav Thakare becoming cm | Sarkarnama

मुंबईच्या  डबेवाल्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद

उर्मिला देठे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली. मुंबई डबेवाल्यांनाही हा आनंद साजरा केला.

मुंबई  : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटल्यानंतर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली. मुंबई डबेवाल्यांनाही हा आनंद साजरा केला. शनिवारी  आणि रविवारी दुपारी डबे पोहोचवण्याचे काम संपताच त्यांनी सर्व सहकार्यांना पेढे, मिठाई भरवत आनंद साजरा केला.

मुंबई डबेवाला संघटना ही 130 वर्षाहून जुनी संस्था आहे. डबेवाल्यांच्या विविध अडचणीत शिवसेना नेहमीच डबेवाल्यांच्या पाठीशी उभी राहिली. यामुळे शिवसेना आणि डबेवाल्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून डबेवाले मानतात.

शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांसाठी झटणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याचा डबेवाल्यांना हा आनंद असल्याचे सांगत, शनिवारी काम कमी असल्याने डबे पोहोचवण्याचे काम संपताच डबेवाल्यांनी दादर, ग्रॅटरोड येथील कार्यालयात हजारो समर्थकांसह एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

तर उर्वरित मंडळींनी अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, दादर, चर्चगेट, मुलुंड, घाटकोपर अशा रेल्वे स्थानकाबाहेर विश्रांतीच्या ठिकाणीही डबेवाल्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.

डबेवाल्यांना सायकल स्टॅन्ड, मोफत सायकल, रेनकोट अशा विविध गोष्टींसाठी शिवसेना नेहमीच मदतीला धावून आली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या डबेवाला भवन आणि डबेवाल्यांसाठी घरकुल योजनेच्या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती नुतन मुंबई टिफीन बॉक्‍स सप्लायर्स ऍन्ड चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख