विधानसभा २०१९ - वडाळ्यात काँग्रेस विरुद्ध कोळंबकर अशी लढत होणार

मागील निवडणुकीत नशिबाने निसटत्या बहुमताने विजयी झालेले आणि तीन पक्ष फिरून आलेले कालिदास कोळंबकर आता भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. इथे कॉंग्रेस विरुद्ध कोळंबकर अशी चुरशीची लढत अपेक्षित आहे. दोघांच्या लढतीत आपल्याला लाभ मिळेल, अशी मनसेची अपेक्षा आहे.
Kalidas Kolambkar - Shivkumar Lad Wadala Election
Kalidas Kolambkar - Shivkumar Lad Wadala Election

डाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार कालिदास कोळंबकर यांनी कॉंग्रेसमधून आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या सर्वत्र भाजपची हवा असल्याने कोळंबकरांनी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारल्याचे म्हटले जात आहे, परंतु, या निर्णयामुळे कोळंबकरांचे खंदे समर्थक नाराज झाले आहेत. याच मतदारसंघात शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव या इच्छुक होत्या; मात्र भाजप-शिवसेना युती झाल्याने कोळंबकरांना उमेदवारी मिळाली असून जाधव यांच्या पदरात निराशा पडली आहे. त्यांची संभाव्य बंडखोरी कशीबशी थोपवण्यात पक्षाला यश आले आहे.

कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांना कॉंग्रेसमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असताना प्रत्यक्षात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे खंदे समर्थक शिवकुमार लाड यांना उतरवण्यात आले. उमेदवारी हुकल्याने वाघमारे समर्थकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. मनसेतून वडाळा विभागप्रमुख आनंद प्रभू निवडणुकीच्या मैदानात असून कॉंग्रेस आणि भाजपच्या भांडणात मनसेला फायदा होईल, असा विश्‍वास मनसे समर्थकांना आहे. वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण पवार, प्रबुद्धा भारत प्रजासत्ताकचे यशवंत वाघमारे व अपक्ष म्हणून प्रवीण घाग रिंगणात आहेत, परंतु यंदा कॉंग्रेस विरुद्ध कोळंबकर अशी लढत वडाळ्यात पाहायला मिळणार असून अखेर बाजी कोण मारणार याकडे मतदारराजाचे लक्ष आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कामगार लोकवस्तीचा पट्टा आहे. गिरण्या, व्यावसायिक गाळे, झोपडपट्ट्या, टॉवर्स अशी सर्व प्रकारची वस्ती असलेल्या या संमिश्र मतदारसंघातून आमदार कालिदास कोळंबकर हे आतापर्यंत सात वेळा निवडून आले आहेत. आधी शिवसेनेत असलेल्या कोळंबकर यांनी 2005 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा बराच बोलबाला होता. या मतदारसंघात मनसेने शिवसेनेएवढीच मते मिळवली. अर्थातच शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचा पुरेपूर लाभ कोळंबकर यांना झाल्याने ते विजयी झाले. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा प्रभाव कमी झाला असला, तरी त्या वेळी युती तुटल्याने शिवसेना-भाजप यांच्या भांडणात कोळंबकर अवघ्या 800 मतांनी विजयी झाले. या निसटत्या विजयामुळे कोळंबकरांची चांगलीच दमछाक झाली होती. यंदा कोळंबकर भाजपमधून लढणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com