Balaji Kalyankar
Balaji Kalyankar

आमदाराचा हक्कभंग; नांदेडचे अभियंता अपमानित करतात, पत्रिकेत नावही टाकत नाही...

तब्बल पाच मिनिटे कल्याणकरांनी भाषण ठोकले...

मुंबई : नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आज नांदेडचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्याविरूद्ध हक्कभंगाचा ठराव मांडला. त्याबाबत त्यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

संबंधीत अधीक्षक अभियंता जाणीवपूर्वक, उद्धटपणे उत्त्तरे देउन माझ्याच मतदारसंघात मला अपमानित करतात, असे त्यांनी विधानसभेत सांगितले. 

आमदार कल्याणकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम २७२ अन्वये श्री. धोंडगे यांच्याविरुध्द हक्कभंगाची सूचना दिली आहे. हे प्रकरण पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी विधानसभेत भाषण केले.

ते म्हणाले, ``माझ्या मतदारसंघामध्ये पूरहानी दुरस्ती फंड  (एफडीआर) मधील ३० कोटीचा पूल नांदेड डिव्हिजनमध्ये असतांनाही भोकर डिव्हिजनमध्ये टाकण्यात आला.  याकामाच्या उद्‍घाटनाच्या फलकावर २२ जानेवारीला झालेल्या कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून माझ्या नावांचा उल्लेख नाही. शासकीय विश्रामग़ृह व अधिक्षक अभियंता कार्यालय (विद्युत) उद्‍घाटनाच्या कार्यक्रम २६ जानेवारीला माझ्या मतदार संघामध्ये होता. त्या फलकांवर आणि निमंत्रणपत्रिकेवर देखील  स्थानिक आमदार म्हणून माझा उल्लेख नाही. एवढेच नव्हे तर, कार्यक्रमाविषयी मला १० मिनिटे आधी सांगण्यात आले. माझ्या मतदारसंघातील काही रस्त्यांची सुमारे ३१० कोटीची कामे विशेष रस्ता दुरुस्ती कामांमध्ये प्रस्तावित करण्यास सांगितले होते. ही  कामे प्रस्तावित करण्यात आली नाहीत. त्याच कामांचा वेगळा प्रस्ताव बजेट प्लेटवर माझे नाव न टाकता प्रस्तावित केला.  

आमदार कल्याणकर म्हणाले, माझ्या मतदारसंघातील ३२ कोटीची पूलांची कामे मी मंजूर करून आणली. त्यांचे अंदाजपत्रक आजपर्यंत तयार करण्यास हे अभियंता टाळाटाळ करीत आहेत. ही कामे बदलण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ६५ कोटीचा उत्तरी वळण रस्ता माझ्या मतदार संघात आहे. त्यांचा १९९० च्या योजनेत समावेश आहे. मार्च, २०२० च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेला रस्ता नकाशे बदलून भोकर मतदार संघात नेण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत.

यासंदर्भात मी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नात्याने विचारणा केली असता, मला उद्धटपणे उत्त्तरे देऊन लोकप्रतिनिधी म्हणून सन्मानजनक वागणूकही दिली नाही. श्री. धोंडगे सीआर नं. १५७/२०१३ मध्ये डांबर प्रकरणांमध्ये हे आरोपी आहेत. ज्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, त्याच पोलिस स्टेशन हद्दीत श्री.धोंडगे यांचे कार्यालय येत असून त्यामुळे या संदर्भात होणा-या चौकशीमध्ये श्री.धोंडगे वेळोवळी हस्तक्षेप करत आहेत. चौकशीमध्ये अडथळा होत असल्याने त्यांची बदली होणे आवश्यक असतांनाही त्यांची बदली करण्यात आलेली नाही, अशीही माहिती कल्याणकर यांनी दिली.

ते म्हणाले, मी माझ्या मतदारसंघात लोकहिताची कामे करीत असतांनाही सदरील कामे आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून डिव्हजन बदलून कामे दुस-या डिव्हजनमध्ये नेऊन माझ्या मतदार संघातील नागरिकांमध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही शासकीय कार्यक्रमासाठी संबधित विभागातील अथवा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिका-यांनी अथवा शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमामध्ये सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे तसेच त्यांना याबाबतीत निमंत्रित करणे. या संबधी शासनाने वेळोवेळी विविध परिपत्रके शासन निर्णय तसेच विधानसभा सभागृहात मा. अध्यक्षांनी देखील वेळोवळी शासनाचे तसेच निर्देश अथवा आदेश दिलेले आहेत. असे असतांनाही अधिकारी त्याचे पालन करत नाहीत.

माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमामध्ये  विधान परिषद सदस्यांना निमंत्रण व  फलकांवर नाव टाकण्यात आले. मला मात्र त्या कार्यक्रमापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदार संघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न  विशेषाधिकाराचा भंग करणारी असल्याचे माझे ठाम मत आहे. याकरिता श्री. धोंडगे यांचेविरुध्द हक्कभंगाची सूचना मान्य करुन सदर प्रकरण पुढील चौकशीसाठी हक्क भंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली आणि अध्यक्षांनी ती मान्य केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com