वाझेच्या नियुक्तीला मिलिंद भारंबे यांचा विरोध परमवीरसिंग यांनी का डावलला? - why Parambirsingh appointed Sachin Waze despite opposed by Joint CP | Politics Marathi News - Sarkarnama

वाझेच्या नियुक्तीला मिलिंद भारंबे यांचा विरोध परमवीरसिंग यांनी का डावलला?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

परमबीरसिंग यांच्याविरोधात फासे पडू लागल्याची चर्चा... 

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परममवीर सिंग (Parambirsingh alleges Rs 100 crore extortion by Anil Deshmukh) यांच्याच कार्यालयातून सर्व सूत्र हलविल्या जात होती, असे मुंबई पोलिस दलाशी संबंधित संकलित केलेल्या अहवालावरून समोर येत आहे. यात परमवीर सिंग यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ला धुडकावत सचिन वाझे याची संवेदनशील ठिकाणी केलेली नियुक्ती आता नजरेत आली आहे. (Sachin Waze appointed by Parambirsingh despite opposed by Joint CP (crime))

यातही सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी वाझे याची `सीआययू` मध्ये नियुक्ती करण्यास विरोध केलेला होता. तो डावलून परमवीर सिंग यांनी आपल्या मनाप्रमाणे केले. अनेक महत्वाचे गुन्हे वाझेकडे सोपविले आणि त्यानंतरच वाझेने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. तो थेट परमवीर सिंग यांनाच रिपोर्टिंग करत होता. इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नव्हता आणि इतर वरिष्ठ अधिकारीही त्याला आदेश देत नव्हते. त्याच वाझेला पकडल्यानंतर परमवीर सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांना लक्ष्य केले आणि या प्रकरणाची सूत्रे आपल्या सोयीनुसार फिरवली. 

सिंग यांचे आरोप आणि त्या संदर्भातील न्यायालयाच्या आदेशामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासूनच राजकारणाची शंका व्यक्त केली जात होती. अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्यासमोर स्फोटके सापडल्यापासून या प्रकरणाला सुरुवात झाली. अनेक वर्षे निलंबित असलेला सह पोलिस निरीक्षक सचिव वाझे एकदम प्रकाश झोतात आला. त्याची नियुक्ती कोणी केली, पोस्टिंग कोणी दिली, त्याच्या जवळ असलेल्या महागड्या गाड्या तसेच त्याचा पोलिस आयुक्तालयातील वावर यांचीही चांगलीच चर्चा होत आहे. मात्र सर्व जबाबदारी आणि प्रकरणाचे खापर अनिल देशमुख यांच्यावर फोडण्यात आले. मात्र पोलिस आयुक्तालयाची काही जबाबदारी आहे की नाही असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सचिव वाझे पुनर्स्थापनेचा निर्णय पोलिस आयुक्तलायातील निलंबन आढावा समितीत घेण्यात आला. वाझेची पदस्थापना सशस्त्र पोलिस दलात करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसांत त्याला गुन्हे गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती देण्यात आली. तो शाखेऐवजी थेट आयुक्तांनाच रिपोर्टिंग करीत होता. महत्त्वाच्या बिफ्रींगच्या बैठकीला तो हजर असायचा. कार्यालायत अत्यंत महागड्या लक्झरी गाड्या घेऊन यायचा. तत्कालीन सहपोलिस आयुक्त यांनी गुन्हे शाखेतील बदलीला विरोध दर्शवला होता, असा लेखी माहितीचा गोपनीय अहवाल मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस सह आयुक्तांनी सचिवांना सादर केला आहे.

अँटेलिया बंगल्या समोरीच सापडलेली गाडी मनसुख हिरेन याची असली तरी ती अनेक महिन्यांपासून वाझेच वापरत होता. हिरेन याच्या खुनाच्या प्रकरणात संबंधित संशयित आरोपी, फोन कॉल्स, घटनास्थळावरील पुरावे याचे तार मुंबई आयुक्तालयाशी जुळत आहे. त्यावरून सर्व सूत्रे आयुक्तालयातूनच हलत होती असा संशय अधिकारी व्यक्त करीत आहेत.

गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांना याची माहिती मिळाली होती. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात अधिकाऱ्यांमुळे प्रॉब्लेम आहे बोलून दाखवले होते. आयुक्तांची थेट बदली केली. याशिवाय एका माजी गृहमंत्र्यांशी संबंधित प्रकरणाचाही तपास सुरू केला होता. त्यामुळे देशमुख यांचाच गेम केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी आपली बाजू मांडणारे सर्व दस्तावेज न्यायालयात सादर केले आहे. सीबीआय तपासाला सर्व सहकार्य केले. सुमारे पंचेवीस वर्षे आपण मंत्रिमंडळाचे सदस्य होतो. आजवर एकाही भ्रष्टाचाराचा आरोप आपल्यावर नाही.मी निर्दोष आहे. ते सिद्ध होणारच आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

 ही बातमी पण वाचा : राज्यातील लाॅकडाऊन वाढणार? : राजेश टोपे काय म्हणाले?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख