रिबेरो यांनी तीन वर्षे आधीच परमबीरसिंह यांना `ओळखले` होते... म्हणूनच पवारांनी टाकली गुगली! - riberao had identified Parambirsingh two years ago | Politics Marathi News - Sarkarnama

रिबेरो यांनी तीन वर्षे आधीच परमबीरसिंह यांना `ओळखले` होते... म्हणूनच पवारांनी टाकली गुगली!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

रिबेरो यांनी चौकशी करावी, अशी पवार यांची मागणी

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्याबद्दल निवृत्त पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी तीन वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. `बॅड काॅप` म्हणून परमबीरसिंह यांची संभावना केली होती.

परमबीरसिंह आरोपांची चौकशी करण्यासाठी ज्युलिओ रिबेरो यांची चौकशी समिता नेमा, असे सांगत शरद पवारांनी गुगली टाकला आहे. सिंह हे मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी अनेकदा  प्रयत्न करत होते. तेव्हा असे `बॅड कॉप` या पदावर नेमू नये असा लेख रिबेरो यांनी सिंह यांचे नाव न घेता जुलै 2018 मध्ये एका इंग्रजी दैनिकात लेख लिहिला होता. लिहिला होता. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री होते. फडणवीस यांनी दबावाला बळी न पडता मुंबई पोलिस आयुक्तांची निवड केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्या वेळी परमबीरसिंह यांची नियुक्ती झाली नाही. सुबोध जयस्वाल यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी तेव्हा नियुक्ती झाली होती.

आपल्याला `बॅड कॉप` म्हटले म्हणून परमबीर सिंह यांनी रिबेरो यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याची धमकी दिली होती. आपली प्रतिमा रिबेरो यांच्या लेखामुळे मलीन झाली असून त्यावर तातडीने माफी मागावी अन्यथा न्यायालयीन लढाईचा इशारा दिला होता. तसेच रिबेरो हे आपल्या प्रतिष्ठेचा कसा गैरफायदा मिळवतात, यावरही त्यांनी या पत्रात लिहिले होते. रिबेरो यांच्या जवळच्या उद्योजक मित्रांना फायदा मिळविण्यासाठी काही गुन्ह्यांच्या तपासात दबाव आणण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला आणि माझ्यासह इतर अधिकाऱ्यांना रिबेरो यांचे फोन कसे यायचे, हे पण त्यांनी या प्रत्युत्तरात दिले होते. प्रत्यक्षात कायदेशीर पातळीवरपुढे काही झाल्याचे दिसून आले नाही. सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी रिबेरो यांच्यासारख्या अधिकाऱ्याकडे चौकशी सोपविण्याची सूचना करत परमबीरसिंह आणि विरोधकांना पेचात टाकले आहे.

पवारांनी टाकलेल्या या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांनीही थेटपणे टोलवले नाही. रिबेरो यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या नावाला थेट विरोध केला नाही. मात्र रिबेरो हे  निवृत्त पोलिस महासंचालक आहेत. ते विद्यमान  गृहमंत्र्यांची चौकशी कसे करतील. देशमुख यांचा आधी राजीनामा घ्यावा आणि नंतर चौकशी करावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख