मनसुख हिरेनचे शवविच्छेदन करणारे तीन डाॅक्टरही NIA च्या रडारवर - three doctors who performed autopsy of hiren are under scanner of NIA | Politics Marathi News - Sarkarnama

मनसुख हिरेनचे शवविच्छेदन करणारे तीन डाॅक्टरही NIA च्या रडारवर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

हिरेन यांच्या चेहऱ्यावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाल्याचे उघड करीत भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हिरेन यांच्या केसमधील अनेक पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला.

मुंबई : मनसुख हिरेन याचे शवविच्छेदन करणारे ठाण्यातील सरकारी रुग्णालायतील तीन डाॅक्टरही राष्ट्रीय तपास संस्थेच्या रडारवर आले आहेत. हिरेन यांच्या शवविच्छेदनाचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यात आले नव्हते तसेच या शवविच्छेदनाच्यावेळी खुनातील आरोपी सचिन वाझे हे पण त्यावेळी उपस्थित असल्याचे पुरावे राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाले आहेत.

वाझे शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहातही केला होता. त्यादृष्टीने आता एनआयए तपास करत असल्याचे दिसून येत आहे. मनसुख हिरेनच्या शवविच्छेदन अहवालाविषयी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. 

हिरेन यांच्या तोंडावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब!
मनसुख हिरन यांचा मृतदेह ज्यावेळी सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडावर सफेद रुमाल असल्याचे सर्वांनीच पाहिले होते मात्र हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाल्याचे उघड करीत भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हिरेन यांच्या केसमधील अनेक पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला.

या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी `एनआयए` ने करावी,  अशी मागणी आमदार शेलार यांनी केली. मनसुख हिरन यांच्या केसमधील अनेक कागदपत्रे उघड करीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही केस दाबण्यासाठी सरकारमधील कोण मंत्री काम करीत होते, असा सवाल केला.

मनसुख हिरेन यांच्या खूनाचे प्रकरण एनआयएकडे गेले. ठाकरे सरकार ही केस एनआयएकडे देण्यास तयार नव्हती. न्यायालयातून आदेश आल्यानंतरही ठाकरे सरकारची त्यास तयारी नव्हती. केंद्रीय गृह सचिवांनी या केसमधील कागदपत्रांची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली पण तरीही हे सरकार कागदपत्रे देण्यास तयार नव्हते. शेवटी ठाण्याच्या न्यायालयाने निर्देश दिले त्यामुळे ठाकरे सरकारसमोर अन्य पर्यायच उरला नाही. त्यावेळी ही कागदपत्रे एटीएसकडून एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आली, असे शेलार यांनी सांगितले.

मनसुख यांचे शव जेव्हा मुंब्रा येथील खाडीत सापडले त्यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मनसुख यांच्या तोंडावर रुमाल होते. मात्र त्यांच्या शवविच्छेदन अवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेलया वस्तुंची जी नोंद आहे त्यामध्ये या रुमालांची नोंद नाही, हे आशिष शेलार यांनी सांगितले. मनसुख यांच्यासारख्या केसमध्ये शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मनावायोगाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडिओ का बनविण्यात आल्या? संपtर्ण चित्रण का करण्यात आले नाही? डॉक्टरांना तसे आदेश कुणी दिले होते? सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी पुरव्यांशी छेडछाड कुणाच्या सांगण्यावरून केले तो मंत्री कोण? तो नेता कोण अशी सरबत्ती  आशिष शेलार यांनी केली.

ज्यावेळी मृतदेहाच्या फुफ्फुसामध्ये पाणी सापडले तर त्या पाण्याची डायटोम टेस्ट करणे आवश्यक होते. हिरेन यांच्या शरीरात पाणी सापडले नाही तरी मग त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले? ही टेस्ट जे. जे. रुण्णालयात होत नाही. तशी परवानगी या रूग्णालयाला नाही. तरीही मनसुख यांचे अवयव जे. जे. रूग्णालयात पुन्हा का उघडण्यात आले? जे. जे. रूग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही फक्त अवयावंचे स्कँनिग केल्याचे सांगितले. टेस्ट करण्यात आली नाही. मग या अवयावयांची छेडछाड करण्यासाठीच ते जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले होते का, असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी करीत मनुसख हिरेन यांनी आत्महत्या केली हे दाखवण्यासाठी ही डायटोन टेस्ट करण्याचा घाट घालण्यात आला होता असा आरोपही त्यांनी केला.

हे प्रकरण एटीएसकडे गेले त्यावेळी एटीएसला लक्षात आले की या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेले रुमाल गायब आहेत, शवविच्छेदनाचे संपूर्ण चित्रीकरण नाही, तसेच डायटोम टेस्ट नाही,  त्यासाठी आवश्यक असलेले अवयव उघडण्यात आले आहेत. त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली आहे त्यामुळे कर्तबगार एटीएसने या प्रकरणी छापे मारून पुरावे गोळा करण्याचे निश्चित करण्यात आले त्यासाठी आवश्यक असलेले शासकीय पंचांना २० मार्चला बोलावून सहा विविध ठिकाणी छापे मारण्याचे एटीएसने ठरवले. त्यासाठीची तयारी पूर्ण केली. सहा ग्रुप तयार करण्यात आले. पण चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एटीएसला छापेमारी करण्याची परवागी सरकारने दिली नाही. त्यानंतरही छापेमारी करू दिली नाही. एटीएसला छापेमारी करून पुरावे गोळा करण्यास कोणी रोखले? त्याचे निर्देश कोणत्या मंत्र्यांनी दिले, असा सवाल आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.

स्थानिक पोलीसांना काम करू दिले नाही. जे केले ते चुकीचे केले. पुराव्यात छेडछाड करण्यात आली. एटीएसला छापेमारी करू दिली नाही. म्हणून राज्य सकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती. म्हणून एनआयए ने या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए करावी,  अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख