मनसे सोडणाऱ्यांनी माफी मागितली... पण राज ठाकरेंनी ताबडतोब दुरूस्ती केली...

मनसेचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या डोंबिवलीत गेल्या २४ तासात मनसेला २ मोठे धक्के बसले.
Manoj Gharat MNS
Manoj Gharat MNS

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला धक्का बसल्यानंतर राज ठाकरे यांनीही तातडीने हालचाली करत मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात केली. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. पक्ष सोडून गेलेले डोंबिवलीचे शहराध्यक्ष यांनी मनसेचे व्हाटस अप ग्रुप सोडले आणि जाातना माफीही मागितली. पण राज यांनी ताबडतोब नवीन नियुक्ती करत डोंबिवली शाखेची बांधबंदिस्ती केली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल, अशी अपेक्षा घरत यांना सुपूर्द केलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. आपली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आपला शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही या पत्रात म्हटले आहे.

मनसेचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या डोंबिवलीत गेल्या २४ तासात मनसेला २ मोठे धक्के बसले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यामागोमाग मनसेचे केडीएमसीतील गटनेते मंदार हळबे यांनी आज मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीत मनसेच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला.

शिवसेनेत प्रवेश केलेले राजेश कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनच कार्यकर्ते होते. मनसेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदासोबतच मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. मनसेकडून राजेश कदम यांनी विधानसभा निवडणुकाही लढवली होती. तर सत्ताधारी पक्षविरोधात विविध प्रकारची अनोखी आंदोलनं करण्यासाठी ते नेहमीच्या चर्चेत असायचे. कदम यांनी सोमवारी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी डोंबिवलीतील मनसेचे अर्जुन पाटील, सागर जेधे आणि अन्य कार्यकर्तेही त्यांच्यासोबत सेनेत गेले. कल्याणचे खासदार डॉ, श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपध्दतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत गेल्याचं कदम यांनी सांगितलं. तसंच मनसेचा व्हॉट्सऍप ग्रुप सोडताना त्यांनी कार्यकर्त्यांची माफीही मागितली.

राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाची बातमी समजताच डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात धाव घेत आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या. कदम यांनी पक्षाची फसवणूक करत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यानंतर राजू पाटील यांनीही राजेश कदम यांच्यासारखा चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसंच कदम यांना काही वैयक्तिक अडचणी असल्यानं ते गेले असावेत, असं म्हणत ते का गेले, हे अनाकलनीय असल्याचं राजू पाटील म्हणाले.

यानंतर दुसऱ्याच दिवशी एकीकडे मनसेनं मनोज घरात यांची शहराध्यक्षपदी निवड जाहीर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनोज घरात यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. तर याचदरम्यान मनसेचे केडीएमसीतील गटनेते मंदार हळबे हे पक्ष सोडून भाजपात गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दादरच्या कार्यालयात हळबे यांनी कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे राजेश कदम हे शिवसेनेत गेल्यानंतर ज्यावेळी मनसेचे कार्यकर्ते आमदार राजू पाटील यांना भेटण्यासाठी जमले होते, त्यावेळी मंदार हळबे हेदेखील तिथे आले होते. मात्र उद्या आपण भाजपात जाणार असल्याची पुसटशीही कल्पना त्यांनी कुणाला येऊ दिली नाही. मनसेला २४ तासात बसलेल्या या दोन धक्क्यांमुळे आगामी महापालिका निवडणुकीत याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे यापुढे मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वतः कल्याण डोंबिवलीच्या मनसेची सगळी सूत्रं हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com