आमदार, मंत्र्यांना त्यांच्या गावागावांत मराठा युवक रोखणार! - MLAs and ministers will be stopped in their villages warn maratha youth im mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार, मंत्र्यांना त्यांच्या गावागावांत मराठा युवक रोखणार!

दिनेश मराठे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

मराठा आंदोलक आक्रमक

मुंबादेवी : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा क्रांती मोर्चा, समाज विद्यार्थी नियुक्ती परिषदेच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदान येथे सरकारी विभागात एसईबीसी प्रवर्गातून निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या 2125 तसेच इतर उमेदवारांना तत्काळ नियुक्‍त्या देण्यात याव्यात. या मागणीकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी "जय जिजाऊ जय शिवराय'च्या जयघोषासह मराठा तरुणांनी सरकारविरोधी घोषणांनी आझाद मैदान दुमदुमून सोडले होते.

आंदोलनात सहभागी होण्याकरिता येणाऱ्या मराठा युवक-युवतींना पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर तसेच काही महत्त्वाच्या भागात ओळखपत्र पाहून रोखल्याचे सांगत सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो, आम्हाला रोखण्यासाठी सरकार का ताकत पणाला लावत आहे? जर असेच असेल तर मराठा युवक राज्यभरात आमदार, मंत्र्यांना त्यांच्या गावागावांत रोखतील. आता संघर्ष अटळ आहे, असे नाशिक येथून आलेल्या मराठा मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी आझाद मैदानात उपस्थित आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात बोलताना सांगितले.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की ऊर्जा विभाग, राज्य सेवा विभाग, एमएमआरडी मेट्रो, क्‍लर्क, मुंबई महापालिका इत्यादी विभागात 2,125 विद्यार्थ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. त्या तत्काळ करण्यात याव्यात. न्यायालयाने नियुक्‍त्या करण्यात येऊ नयेत, असा आदेश काही दिलेला नाही. तरीही आम्हाला नियुक्‍त्या देण्यात येत नाहीत हे अयोग्य असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त
आझाद मैदानात उभारण्यात आलेल्या मंडपात जवळपास 150 ते 200 मराठा युवक पाहायला मिळाले. आंदोलन स्थळी जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलकांच्या पिशव्या, तसेच ओळखपत्रे तपासताना दिसत होते. आझाद मैदानात आंदोलकांव्यतिरिक्त अन्य कोणालाही सोडले जात नव्हते. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले हे स्वतः ओळखपत्रे तपासत आंदोलकांना प्रवेद्वारातून आत सोडत होते. त्यामुळे 300 हून अधिक आंदोलक इतरत्र असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख