मनसे नेते अविनाश जाधवांना तडीपारीची नोटीस : खंडणी विरोधी पथकाचीही कारवाई - anti extortion cell acts against MNS leader Avinash Jadhav in Thane | Politics Marathi News - Sarkarnama

मनसे नेते अविनाश जाधवांना तडीपारीची नोटीस : खंडणी विरोधी पथकाचीही कारवाई

दीपक शेलार
शुक्रवार, 31 जुलै 2020

शुक्रवारी सायंकाळीदेखील जाधव यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मनसे संतप्त झाली असून याचे पडसाद राजकिय वर्तुळातही उमटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष तथा राज ठाकरे यांचे खंदे समर्थक अविनाश जाधव यांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल 20 हुन अधिक गुन्हे दाखल असल्याने विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली.

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या जाधव यांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. दरम्यान,शुक्रवारी सायंकाळीदेखील जाधव यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मनसे संतप्त झाली असून याचे पडसाद राजकिय वर्तुळातही उमटण्याची चिन्हे आहेत.

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी,काही दिवसांपुर्वीच भेट नाकारणाऱ्या वसई-विरार मनपाच्या आयुक्ताच्या दालनात शिरून उग्र आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते.या पाश्र्वभूमीवर,वसई-विरार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी जाधव यांच्यावर दाखल असलेल्या 17 न्यायप्रविष्ठ आणि 3 तपास सुरू असलेल्या गुन्ह्यांची जंत्री मांडुन पालघर जिल्हयालगतचे ठाणे, ठाणे ग्रामीण,नवीमुंबई, बृहन्मुंबई व रायगड या भागासाठी हददपारीची नोटीस बजावली.

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि इतर स्टाफ यांना सहा महिन्यांच्या करारावर घेतले असताना अचानक नोटीस देऊन 31 जुलैपासून कामावर येऊ नये.असे आदेश पालिकेच्यावतीने देण्यात आल्याने, या परिचरिकांना घेऊन शुक्रवारी अविनाश जाधव यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले.तसेच, ठाणे महापालिका ठेकेदार चालवतात असा गंभीर आरोप केला.त्यानंतर,काही वेळातच ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जाधव यांना ताब्यात घेत चार तास चौकशीसाठी थांबवुन ठेवले.त्यामुळे,संतप्त मनसैनिकांनी खंडणी पथकाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.तर,अविनाश जाधव यांच्यावरील अन्याय कारवाई अन्यायकारक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला.

कोणत्याही दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करणारी संघटना आहे. सरकारच्या कोणत्याही दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. आमचे सर्व कार्यकर्ते नागरिकांवरील अन्यायाविरोधात लढा देतच राहतील. त्यासाठी रस्त्यावरील लढाई लढण्यास महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असे संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख