राष्ट्रवादीचा काॅंग्रेसला धक्का : भिवंडीतील 18 नगरसेवकांनी `हाता`ची साथ सोडून `घड्याळ`बांधले - 18 corporators of Congress from bhiwandi join ncp today | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचा काॅंग्रेसला धक्का : भिवंडीतील 18 नगरसेवकांनी `हाता`ची साथ सोडून `घड्याळ`बांधले

शरद भसाळे
बुधवार, 23 डिसेंबर 2020

शिवसेनेचे पारनेरमधील पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले तेव्हाही खळबळ माजली होती. त्या वेळी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत हे नगरसेवक परत पाठविण्यास भाग पाडले. भिवंडीतील घडामोडींवर काॅंग्रेस काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. 

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या 18 पैकी 16 नगरसेवकांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला खिंडार पडले. या घडामोडींमुळे  राजकीय गटात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील पक्षातच फोडाफोडी झाल्याने त्याचे काय राजकीय पडसाद उमटणार याची उत्सुकता आहे. या आधी पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने गदारोळ उडाला होता. 

भिवंडी  महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या  18 नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा  पराभव झाला.पालिकेत काँग्रेस पक्षाचे बहुमत असतानाही नामुष्की ओढवल्याने 18 फुटीर नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यावर या नगरसेवकांना कार्यालयात बोलावून आयुक्तांनी सुनावणीद्वारे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली असताना अचानकपणे आज दुपारी हा पक्षप्रवेश झाला. 

राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली या 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.

काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर नगरसेवक अहमद सिध्दीकी, मतलुब सरदार खान,मलिक मोमीन, अर्षद अन्सारी, अंजुम सिद्दिकी, जरीना अन्सारी,शबनम अन्सारी, नमरा औरंगजेब अन्सारी अशा 16 नगरसेवकांचा यात समावेश आहे. काही महिला नगरसेवकाऐवजी त्यांच्या पतीने राष्ट्रवादीत प्रवेश केला  असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाचे बंडखोर उपमहापौर इमरान खान व त्यांचे पत्नी मिसबा खान या बाहेर गावी असल्याने कार्यक्रमास उपस्थित नव्हते.

भिवंडी शहर महापालिकेत शिवसेना व काँग्रेस पक्षाची युती आहे. महापालिकेत काँग्रेस पक्षाचे 47 व शिवसेनेचे 12 नगरसेवक असल्याने बहुमत आहे. असे असताना महापौर व उपमहापौर पदासाठी 5 डिसेंबर 2019 रोजी  झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी पक्षा आदेश झुगारून  कोणार्क विकास आघाडीच्या  महापौर पदाचा उमेदवारास मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका  पराभव झाला. या घटनेमुळे काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असून गटबाजीला उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांचे नगरसेवक पद  रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पालिकेचे माजी महापौर जावेद दळवी, माजी सभापती प्रदीप राका यांनी  काँग्रेस पक्षाचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यांनी दुर्लक्ष केल्याने या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्त आयुक्त यांच्याकडे  तक्रार 
करण्यात आल्याने केली होती. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या आदेशावरून भिवंडी पालिकेच्या नगरसचिव विभागाने काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारणाऱ्या 18 नगरसेवकांना नोटीस बजावली होती. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे त्यांचे पद रद्द होण्याची भिती असल्याने त्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

आगामी ग्रामपंचायत व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यनिहाय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली.  त्याचे वेळी हा पक्षप्रवेश झाला.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर निर्मला सावळे, माजी विरोधी पक्ष नेता लियाकत शेख, औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत, अमरावती जिल्ह्याचे डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला.

आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री निल देशमुख, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख