एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांना मारहाण : निरीक्षकावर कारवाईची मागणी - MNS activists beaten in Eknath Shinde's program: Demand for action against inspectors | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांना मारहाण : निरीक्षकावर कारवाईची मागणी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

तुळिंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या दोन्ही कार्यकर्त्यांच्या कॉलरला पकडून, मारहाण करीत ताब्यात घेतले होते. याच वेळी त्यांनी अश्‍लील शिवीगाळही केली असल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

नालासोपारा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात "आयुक्त साहेब वेळ द्या' अशी घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून शिवीगाळ करणारे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचे निलंबन करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या शिष्टमंडळाद्वारे विरार झोन तीनचे पोलिस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांची भेट घेत केली. 

आठवडाभरात कांबळे यांचे निलंबन झाले नाही, तर तुळिंज पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसे नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते हे काय भूमिका घेतात हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मंगळवारी (ता. 5) वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उद्‌घाटन आणि नूतनीकरण सोहळ्याचे उद्‌घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमात मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी "आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या' अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्या वेळी तुळिंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या दोन्ही कार्यकर्त्यांच्या कॉलरला पकडून, मारहाण करीत ताब्यात घेतले होते. याच वेळी त्यांनी अश्‍लील शिवीगाळही केली असल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. कांबळे यांच्या या वर्तनाचा मनसे नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत कांबळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख