शिवाजीराव निलंगेकरांना व्ही. पी. सिंहांनी परराष्ट्रमंत्रीपदाची आॅफर दिली होती... - V. P. Singh had offered the post of Foreign Minister to Shivajirao Nilangekar | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजीराव निलंगेकरांना व्ही. पी. सिंहांनी परराष्ट्रमंत्रीपदाची आॅफर दिली होती...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

दिवंगत सदस्यांप्रती विधीमंडळात आज शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. सिंह हे पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात येण्याचे निमंत्रण त्यांनी निलंगेकर यांना दिले होते. एवढेच नव्हे तर त्यांना परराष्ट्रमंत्री करण्याचीही आॅफर त्यांनी दिली होती. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या निलंगेकरांनी ती स्वीकारली नाही. तरी त्यांचा सिंह यांच्याशी स्नेह कायम होता, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगेकरांना आज विधानसभेत आदरांजली वाहिली.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शिवाजीराव पाटील निलंगेकर, चंद्रकांता गोयल, अनिल राठोड यांच्यासह अन्य नेत्यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. 

त्यावेळी निलंगेकर यांच्या आठवणी सांगताना त्यांनी व्ही. पी. सिंह यांच्याशी स्नेहाचा उल्लेख केला. तसेच एका कामासाठी त्यांना मला मी मुख्यमंत्री असताना भेटायचे होते. तेव्हा मी तुमच्याकडे येतो, असा निरोप मी त्यांना दिला होता. मात्र आपण मुख्यमंत्री आहात, आपण येणे योग्य नसल्याचे सांगत तेच मला माझ्या निवासस्थानी भेटल्याची आठवण त्यांनी सांगितली. निलंगेकर पाटील यांनी विधान भवनाच्या या नवीन वस्तूच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. तालुका पातळीवर एमआयडीसी निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ मागास भागाचा अनुशेष यात मोठे योगदान दिले. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे असे एकमेव सदस्य असतील, ज्यांना आडनाव सभागृहाने दिले. त्यावेळी तीन शिवाजीराव पाटील सभागृहात होते. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्यांना निलंगेकर हे आडनाव दिले, असेही त्यांनी सांगितले. राज्यात 2003 मध्ये दुष्काळ असताना सोनिया गांधी यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी महसूलमंत्रिपद स्वीकारले, असेही त्यांनी नमूद केले. 

प्रणव मुखर्जी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, ``३९ मंत्रिगटाचे काम प्रणवदा यांनी पाहिले. सोनियांनी राष्ट्रीय पातळीवर राजकारणात काम करावे, याचा आग्रह त्यांनीच धरला. संस्कृतवर त्यांची पकड होती. अटलजी यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे ते पालकत्वाच्या भूमिकेतून ते पाहत. प्रणवदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर सुद्धा आले.५० वर्ष त्यांनी नियमित डायरी लिहिली. मृत्यूनंतर ती प्रकाशित व्हावी, ही त्यांची इच्छा होती.

अनिलभय्या राठोड, सुधाकरपंत परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्णबाबा पाटील, सीतलदासजी खूबचंदानी, सुनील शिंदे, शामराव पाटील, सुरेश पाटील, रामरतन बापू राऊत, चंद्रकांताताई गोयल या सदस्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख