खडसेंना मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही, याचे रहस्य उलगडणार पुस्तकातून - The secret of why Khadse did not get the Chief Minister's post will be revealed in the book | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंना मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही, याचे रहस्य उलगडणार पुस्तकातून

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र बोलविण्यात आलेले नाही. 

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे भाजपमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. त्याचे नेमके रहस्य काय, याचा उलगडा आता पुस्तकातून होणार आहे. खडसे यांच्या वाढदिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

खडसे हे 2019 पर्यंत विधानसभेतील सदस्य होते. विरोधी पक्षनेते असतांना त्यांनी तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सरकारला आपल्या आक्रमकतेने ‘सळो कि पळो’ केले होते. सन २०१४ च्या निवडणूकीत तब्बल २५ वर्षे असलेली शिवसेना भाजपची युती तोडण्याबाबतचा निर्णय पक्षाच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनीच जाहीर केला होता. भाजपला निवडणूकीत सर्वात जास्त जागा मिळतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त करून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागाही मिळाल्या होत्या. त्यावेळी तेच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र ते होवू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात खंतही बोलून दाखविली होती.

पुढे त्यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाला अन त्यांना मंत्रीमंडळातून बाहेर पडावे लागले.सन २०१९ च्या निवडणूकीत पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली नाही.या शिवाय त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार आहेत. आता पुस्तकाच्या माध्यमातून ते जनतेसमोर येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रा.सुनील नेवे यांनी ‘जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे’हे पुस्तक लिहले आहे. प्रा.नेवे हे भालोद (जि.जळगाव) येथील महाविद्यालयात राजशास्त्र विषय शिकवितात. तसेच ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटक आहेत. खडसे यांच्या समवेत त्यांनी राजकीय कार्य केले आहे. खडसे यांच्या राजकीय जीवनाबाबतची माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद का मिळू शकले नाही?याचे  विश्‍लेषणही त्यांनी या पुस्तकातून केले आहे.

पुस्तकाबाबत बोलतांना प्रा.सुनील नेवे म्हणाले, खडसे यांच्यावर लिहीलेले पुस्तक केवळ गौरवग्रंथ नाही. तर त्यांच्या जीवनावर केलेले सटीक विश्‍लेषण आहे. त्यात संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.त्यांनी विधीमंडळात केलेली भाषणे, जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य याची माहितीही या पुस्तकात असणार आहे. आजच्या युवा वर्गाला खहसे काय आहेत,याची माहिती या पुस्तकातून मिळणार आहे.

खडसे यांचा दोन सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्या दिवशी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या पुस्काचे प्रकाशन होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख