`शरद पवारांची मुलाखत देशात खळबळ माजविणार` - interview of Sharad Pawar will be sensational says sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

`शरद पवारांची मुलाखत देशात खळबळ माजविणार`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 जुलै 2020

पवारांच्या मुलाखतीबद्दल उत्सुकता

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत देशात खळबळ माजवणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव असतानाच, त्यांनी घेतलेली पवारांची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे. खुद्द राऊत यांनी या मुलाखतीची माहिती ट्‌विटरद्वारे दिली. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा राऊत यांनी आपल्या ट्‌विटमध्ये केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतींनंतर, संजय राऊत यांनी "सामना' दैनिकासाठी पहिल्यांदाच अन्य राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी चीनपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडल्याचे संजय राऊत म्हणाले.

"सामना'त लवकरच या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहेत. तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरही मुलाखत प्रसारित होणार असल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच "सामना'त प्रसिद्ध होईल आणि वृत्त वाहिन्यांवर पाहता येईल. पवार चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडींपर्यंत जोरदार बोललेत.

शरद पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानानजिक ही मुलाखत झाली. त्यानंतर मी ठाकरे यांना भेटायला गेलो, असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख