असे कोणते कारण होते की जयंत पाटील हे शरद पवारांना भेटायचं टाळत होते? - What was the reason that Jayant Patil was avoiding meeting Sharad Pawar? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

असे कोणते कारण होते की जयंत पाटील हे शरद पवारांना भेटायचं टाळत होते?

महेश जगताप
सोमवार, 6 जुलै 2020

मंत्रिपदापेक्षा मला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद महत्त्वाचे आहे, असे म्हणणारे जयंत पाटील आता शरद पवार यांच्या सध्या फार जवळ आहेत. मात्र हेच जयंत पाटील कधी काळी शरद पवारांना भेटायचे टाळत होते. त्याला कारणही तसेच होते. मात्र त्यानंतर पवार हेच पाटील यांचे `गाॅडफादर` झाले. 

पुणे :  माझ्या जडणघडणीत पवारसाहेबांचे मोठे योगदान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पवारसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

जयंत पाटील यांनी देखील खासदार शरद पवार यांच्याप्रती गुरू पोर्णिेमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त करत एक व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर प्रसारीत केला आहे. शरद पवार यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करत असताना जयंत पाटील यांनी बऱ्याचशा आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात त्यांनी अनेक राजकीय घडामोडी उलगडून दाखवल्या आहेत. 

जयंत पाटील म्हणतात, माझे वडील राजारामबापू हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे आमच्या घरी बऱ्याच थोरामोठ्या नेत्यांची उठबस होत असे मात्र पवारसाहेबांच्या व्यक्तीमत्वाविषयी मला पूर्वीपासूनच आकर्षण होते. इतरांपेक्षा हा नेता वेगळा वाटायचा. पवारसाहेबांमध्ये फक्त विकासाचा ध्यास दिसायचा. सिमला येथे एआयसीसीचे अधिवेशन होते तेव्हा मीही बापूंसह अधिवेशनाला गेलो होतो. पवारसाहेब आणि आमची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा पवारसाहेबांना पहिल्यांदा जवळून अनुभवता आले.

राज्यात 1991 मध्ये मुख्यमंत्री बदलण्याची एक मोहीम सुरू झाली होती. तेव्हा आमच्या सांगलीच्या सर्व आमदारांनी सुधाकर नाईक यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यामुळे मलाही सुधाकर नाईक यांना पाठिंबा द्यावा लागला. कालांतराने तेही सरकार पडले आणि आदरणीय साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले. मला वाटलं साहेब आता काही आपल्या कामाची नोंद घेणार नाही. एकेदिवशी आमदार म्हणून एक काम घेऊन साहेबांकडे गेलो होतो. चिठ्ठीत माझं नाव पाहताच त्यांनी मला सर्वात आधी बोलावून घेतले व जेवणाच्या वेळी भेटायला ये म्हणून सांगितले. भेटीदरम्यान साहेबांनी माझा मतदारसंघ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी साहेबांच्या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन केले व साहेबांना एका कार्यक्रमानिमित्त बोलावले. मोठी जंगी सभा घेतली. तेव्हापासून साहेबांनी मला जवळ केले आणि माझ्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली अशी आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली आहे.

राजारामबापूंचे निधन झाल्यानंतर मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीने पवार साहेबांकडे गेलो आणि म्हणालो आम्हला तुमच्या नेतृत्वाखाली समाजवादी काॅंग्रेसमध्य काम करायचे आहे. पण पवार साहेब म्हणाले आत्ताच बापूंचे निधन झाले आहे आणि लगेच मी तुम्हाला घेतल्यानंतर माझ्यावर जनता पक्ष फोडला, असा आरोप होऊ होईल. त्यामुळे आता तरी थोडं थांबा असे ते मला म्हणाले. पण वसंतदादा पाटील यांनी तीन-चार वेळा मला काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह धरला होता. मग त्या आग्रहाखातर मी काँग्रेसमध्ये गेलो. १९९० च्या कालखंडात मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर पवार साहेब मला म्हणाले, तू वाटत नव्हते आमदार होशील. सुधाकर नाईकांना पाठींबा देण्याचा हा माझा निर्णय पवार साहेबांना आवडला नाही. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात अंतर पडले. त्यानंतर पवार साहेबच  मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी त्यांना भेटायला जाण्याच टाळत होतो. कारण त्याआधी नाईक यांना पाठिंबा दिल्यामुळे माझी फारशी दखल घेतील, अस मला वाटायचं नाही. पण एकदा धाडस करून इतरा आमदारांसोबत भेटण्यासाठी चिठ्ठी दिली. सगळ्यात आधी मला बोलवलं आणि आणि त्यांनी मला दुपारच्या जेवणासाठी बोलावलं. मी दुपारी परत गेलो. चर्चा झाली.  तुझ्या मतदारसंघात मला यायचं आहे, असे त्यांनी मला सांगितलं, अशी आठवण जयंतरावांनी सांगितली.

पवार आणि जयंत पाटील यांचे सूर जुळळ्यानंतर पाटील यांनी त्यांनी १९९५ मध्ये राज्याच्या साखर संघाचे अध्यक्षपद दिले. ज्यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा नवीन पक्ष काढायचे ठरले. त्याबद्दलही जयंतरावांनी सांगितले. ``त्या वेळी मी साहेबांना फोन केला आणि सांगितलं बापूंचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पण मला राजकीय कोण गॉडफादर नाही. मी असे म्हणाल्या बरोबरच त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या मुलासारखा आहे. तू काही काळजी करू नको. तू तुझा लवकर निर्णय घे. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आले. त्यावेळी मला साहेबांनी तू मंत्री होणार आहे, असे सांगितले. पण तुझ्याकडे ऊर्जा खाते देणार आहे असं म्हणाले. त्यावेळी मी म्हणालो, मी जर वीज दर वाढवले तर आमच्याकडे लोक नाराज होतील. त्यामुळे मला हे खाते नको. दुसरे कोणते तरी द्या. त्या दिवशी पुन्हा रात्री दोन वाजता मला मला फोन आला. तू अर्थमंत्री होणार आहे. मी जरा गोंधळून गेलो. आहो साहेब, हे खात तर सर्वात बुजुर्ग माणसाला दिले जाते. मी तर आता सदतीस वर्षाचा आहे. मग हे कसं? त्यावेळी मला साहेब म्हणाले तू आत्ता अर्थखाते सांभाळ . तुला सर्व खात्याचे आर्थिक  नियोजन कसे होईल हे समजेल व तुझा प्रशासनावर  पकड राहील, असं मला साहेबांनी समजून सांगितलं. त्यावेळी मी अर्थमंत्रीपद स्वीकारले, असे जयंतरावांनी सांगितले. 

मुंबईवरील 2008 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते खातेही साहेबांनी आपल्याकडे कसे दिले, याचाही किस्सा जयंतरावांनी नमूद केला आहे.

``मी जर आबांच्या जागी गृहमंत्रीपदी बसलो तर आमच्या लोकांत गैरसमज होतील त्यामुळे मला गृहमंत्रीपद नको. दुसरे कोणाला तरी द्या. पण पवार साहेबांनी ऐकले नाही. तुलाच पहावे लागेल असे सांगितले. 

पुढे २०१४ नंतर पक्ष विरोधी बाकावर बसला आणि पक्षावर वाईट वेळ आली. अनेक लोक बाजूला बसलेले पक्ष सोडून जात होते. साधनसामग्री अतिशय तुटक होती. काय करावं हे समजत नव्हतं पण त्याही वेळी पवार साहेबांनी आम्हाला धीर दिला. विरोध कसा करायचा असतो ,विरोधात असताना कसं वागायचं याच आम्हाला मार्गदर्शन केलं व अनेक निर्णयांमध्ये मी प्रदेशाध्यक्ष असल्याकारणाने मला सहभागी होत आल. हा अनुभव फार वेगळा होता. निर्णय धाडसाने घ्यायचो आणि अंमलबजावणी करायची हे मी साहेबांकडून शिकलो. ज्यावेळी साहेब प्रचारासाठी याही वयात बाहेर पडले त्यावेळी आम्ही सर्व अवाक झालो होतो. त्यांच एक वेगळंच रूप आम्हाला पाहायला मिळालं. अशा धुरंदर  राजकीय  माणसाच्या सावलीत  मला गेली चाळीस वर्षे राहता आलं . अनेक गोष्टी शिकता आल्या,`` असे म्हणत अनेक आठवणी पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जागवल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख