राजू शेट्टींनी आत्मपरिक्षण करण्याची गरज : सदाभाऊ खोत - raju shetty introspect advices sadabhau khot | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टींनी आत्मपरिक्षण करण्याची गरज : सदाभाऊ खोत

उमेश घोंगडे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांचा नेता असलेल्या शेट्टी यांनी या विधेयकाचे स्वागत करून विधेयकात आवश्‍यक त्या सूचना करायला हव्या होत्या. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी आज हयात असते तर त्यांनी या विधेयकाचे स्वागत करीत काही सुधारणा सुचविल्या असत्या, असे मत खोत यांनी व्यक्त केले.

पुणे : कृषी विधेयकांच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या दृष्टीने गेल्या सत्तर वर्षातील ऐतिहासिक निर्णय झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णयाला विरोध करून माजी खासदार राजू शेट्टी काय साध्य करीत आहेत, असा प्रश्‍न करीत शेट्टी यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे मत माजी मंत्री व शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केले.

"सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारचे कृषी विधेयक ही शेतकऱ्यांच्या जीवनातील नवी सुरवात असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस येण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे चांगले पाऊल आहे. मात्र, विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांचा नेता असलेल्या शेट्टी यांनी या विधेयकाचे स्वागत करून विधेयकात आवश्‍यक त्या सूचना करायला हव्या होत्या. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी आज हयात असते तर त्यांनी या विधेयकाचे स्वागत करीत काही सुधारणा सुचविल्या असत्या. हीच भूमिका शेट्टी यांनी घ्यायला हवी होती. विधेयकाचे स्वागत करण्याऐवजी विरोध करणाऱ्या शेट्टी यांनी खरोखरच आत्परिक्षण करण्याची गरज असल्याचे खोत यांनी सांगितले.

खोत म्हणाले, "" या विधेयकामुळे भारताच्या शेती क्षेत्रात मोठे बदल होण्यास मदत होणार आहे. आपल्या मालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती हा एकच पर्याय होता. मात्र, नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला बाजार समितीशिवाय अनेक पर्याय निर्माण होणार आहेत. परिणामी त्यांच्या मालाला स्पर्धात्मक भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांना विक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील तर अडचण काय आहे. याचे उत्तर न देता बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असा गैरसमज पसरवत विरोध केला जात आहे.वास्तविक या कायद्याने बाजार समित्यांचे अस्तित्व कुठेही संपणार नाही. मात्र, त्यांना स्पर्धा करणारी नवी यंत्रणा उभी राहणार असल्याचे बाजार समित्यांच्या माध्यमातून असलेली सत्ता जाण्याची भीती विरोधकांना वाटत आहे. त्यांची ही भूमिका सत्तेच्या हितसंबंधांसाठी सोयीची असली तरी शेतकऱ्यांच्या हिताची नाही. गेल्या सत्तर वर्षात शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या माध्यमातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी नवे विधेयक मैलाचा दगड ठरू शकेल. मात्र, विरोधकांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वत:चे हितसंबंध महत्वाचे असल्याने विरोध केला जात आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख