भाजप शिवसेनेशी पुन्हा युती करणार का? : या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणतात.. - Will BJP form an alliance with Shiv Sena again on this question Fadnavis says this | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप शिवसेनेशी पुन्हा युती करणार का? : या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

फडणवीस यांचे या विषयावर अद्याप ठरलेले नाही...

पुणे : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांत सुरू असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनीही याबाबत थेट काही उत्तर दिले नाही. हे सरकार जेव्हा पडेल तेव्हा त्यावर विचार करू, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र हे उत्तर देताना शिवसेनेला चिमटेही काढले.

`साप्ताहिक विवेक`ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अशी युती करणे म्हणजे भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानशी तडजोड होईल, असे कार्यकर्ता वर्तुळात मत असल्याचाही उल्लेख प्रश्नात होता. फडणवीस यांनी या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे

फडणवीस : माध्यमांमध्ये काय चर्चा केल्या जातात, त्याकडे मी फार गांभीर्याने पाहत नाही. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. परस्पर विसंगत भूमिका असलेले सरकार फार काळ टिकत नाही, हा इतिहास आहे. हे सरकार स्वत: होऊन ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी काय करायचे हे तेव्हा ठरवू.

रामजन्मभूमी आंदोलनाची फलश्रुती म्हणून देशभर हिंदुत्वाचा जनाधार वाढला. त्याचा भाजपाला फायदा झाला. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करून भाजपाने आपल्या जनाधारात वाटेकरी निर्माण केला, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आताच्या परिस्थितीत युती तुटलेली असताना, हिंदुत्वापासून शिवसेना दूर जात असताना या गोष्टींचा नव्याने कशा प्रकारे विचार केला जाऊ शकतो?

भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या आणि भूमिका ही अनेक वर्षांच्या आणि अनेक नेत्यांच्या त्यागाची फलश्रुती आहे. त्यामुळे त्यात कधीही बदल करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. राममंदिर असो की काश्मीर, भाजपाचा कुठलाही वचननामा काढून पाहिला, तरी त्यात एकच भूमिका घेतलेली तुम्हाला दिसून येईल. जेव्हा पूर्ण बहुमतातील सरकार देशाने भाजपाला दिले, तेव्हा त्याची संकल्पपूर्तीसुद्धा झालेली आपण अनुभवतो. भाजपाची भूमिका मांडण्याचा मला अधिकार आहे. इतरांबद्दल मी काय बोलावे? जनता सारे पाहते आहे.

महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण पाहता भाजपाने स्वत:ची स्पेस निर्माण करण्यासाठी भविष्यात कोणत्या विषयावर काम केले पाहिजे, असे आपणास वाटते?

फडणवीस : महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाची स्वत:ची स्पेस आधीपासूनच आहे. आज राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपालाच राज्यातील जनतेने पसंती दिली आहे. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश काय होता, हेही सर्वांना ठाऊक आहे. घात कुणी आणि कसा केला, तोही जनतेला ठाऊक आहे. या अनैसर्गिक व्यवस्थेमुळे भाजपा आज विरोधी पक्षात असला, तरी सेवा हे भाजपाचे ब्रीद आहे आणि ते अव्याहत सुरू आहे. कोरोनाचा कालखंड असला आणि आम्ही सत्तेत नसलो, तरी राज्यातील सर्वाधिक सेवा कार्य भाजपाने केले. लोकांचे विषय प्रभावीपणे मांडण्याला आणि संकट कोणतेही असो, सेवाभाव टिकवून ठेवण्यालाच भाजपाचे प्राधान्य राहिले आहे आणि असेल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख