`उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यातील कटुता संपावी, असे मलाही वाटते!`

राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक आणि सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची `सरकारनामा`ला खास मुलाखत
Rane-Uddhav-Anaskar
Rane-Uddhav-Anaskar

सरकारनामा ब्युरो : "एकदा उद्धवजींचा (Uddhav Thackeray ) मला फोन आला आणि त्यांनी मला एका व्याख्यानासाठी बोलावले, मात्र मला जायला जमले नाही, ही गोष्ट जेव्हा नारायण राणे (Narayan Rane), यांना कळाली तेंव्हा ते माझ्यावर ओरडले, तुम्ही का नाही गेले, असे परत करू नका, असे नारायण राणेंनी मला सांगितले होते. या दोघांत राजकीय वाद असला तरी त्यांच्यातील जुनी ओळख संपलेली नाही, असे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष  व राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधन अनास्कर यांनी सांगितले.

नारायण राणे यांचे जवळचे मित्र अशी ओळख असलेल्या अनास्कर यांची ठाकरे यांनी सहकार परिषदेवर नियुक्ती केली. या पदाची सूत्रे त्यांनी नुकतीच स्वीकारली. त्यानिमित्त `सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतीत अनास्कर यांनी या दोघांमधील विविध आठवणी, सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने यावर मनमोकळी मते मांडली.

नारायण राणे यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे हे देखील जवळचे मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावर राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षातील कटुता संपविण्याचा सल्ला राणे यांना का देत नाही, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण मोठ्या लोकांमध्ये काय बोलणार? राजकारणाबद्दल मला फारशी काही माहीती नाही. त्यामुळे ज्या क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यात आपण सल्ला देऊ नये, मात्र सामान्य नागरिकांप्रमाणे मला सुद्धा या दोघांमध्ये इतके शत्रूत्व नसावे, असे वाटते.

फडणवीस सरकारने तुमची राज्य बॅंकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी ती कायम ठेवली. त्यानंतर तुम्हाला सहकार परिषदेचे अध्यक्षपदही देण्यात आले. हे कसे काय झाले. तुम्ही चारही पक्षांचे लाडके कशामुळे आहात, या प्रश्नावर अनास्कर म्हणाले की मी कोणाचा लाडका नाही. माझे काम आणि सहकार क्षेत्रात थोडेफार जे योगदान दिलेले आहे. त्यामुळे माझ्या गुणवत्तेवर ही निवड झाली असावी, असे मला वाटते.

राणे यांचे जवळचे मित्र असूनही तुमची कशी काय निवड ठाकरे यांनी केली, यावर ते म्हणाले मी राणे यांच्या जवळचा आहे, ठाकरे यांना माहिती आहे. मात्र सहकार क्षेत्रात चांगले काम करणारा कार्यकर्ता म्हणूनही ते मला ओळखतात. त्यामुळे राणे आणि त्यांचा राजकीय संघर्ष असला तरी तो दोघांनीही मला जाणवू दिला नाही. ठाकरे यांनी मला नेमले म्हणून राणे यांनीही नाराजी व्यक्त केली नाही. तसेच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी अंतर जाणवू दिले नाही, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.  

केंद्रातील सहकार खाते हे अमित शहा यांच्याकडे गेल्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का, असे विचारले असता हे खातेअमित शहा यांच्याकडे गेले नसते तर याबाबत फारशी चर्चा झाली नसती. शहा यांच्याकडे ही जबाबदारी  गेल्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. त्यांचा आक्रमक स्वभाव, प्रसार माध्यमांद्वारे निर्माण झालेले वातावरण असो किंवा सहकार क्षेत्र हे महाराष्ट्रातीमध्ये एका विशिष्ट पक्षाच्या ताब्यात आहे, असा समज केला जातोय म्हणून ही चलबिचल निर्माण झाली असावी, असे मत अनास्कर यांनी व्यक्त केले..

अमित शहा हे  बँकिंग क्षेत्रामधूनच पुढे आलेले आहेत. ते आम्हांला मदत करतील अशी अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य या दोघांनी मिळून जर काम केलं तर ती चांगली गोष्ट असून त्यांचे स्वागत आहे. मात्र, एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर सहकार खाते नष्ट केले जात असेल, तर ते योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनास्कर म्हणाले, ``सहकार क्षेत्र हे कोणत्या एका पक्षाचे नसते. संबंधित संस्थांवर त्या पक्षाच्या विचाराचे माणसे असतात म्हणून त्या संस्थेवर विशिष्ट पक्षाचा स्टॅम्प मारला जातो. यामुळे त्या संस्थांचे नुकसान होते. हा सहकारला लागलेला हा डाग आहे. सहकाराचे भले कोण करतय यापेक्षा सहकाराचे भले झाले हे महत्वाचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com