रूपी बॅंकेच्या सर्व ठेवीदारांचे शंभर टक्के पैसे परत मिळणार का? : अनास्करांनी दिले हे उत्तर!

रूपी सहकारी बॅकेचे विलीनीकरण हे व्यापारी बॅंकेमध्ये होईल. याबाबतचा आराखडा रिझर्व बॅंक तयार करेल, असा विश्वास अनास्कर यांनी व्यक्त केला आहे.
रूपी बॅंकेच्या सर्व ठेवीदारांचे शंभर टक्के पैसे परत मिळणार का? : अनास्करांनी दिले हे उत्तर!
anaskar

पुणे : ``रूपी सहकारी बॅंकेला राज्य सहकारी बॅकेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र, तो धोरणात्मक दृष्ट्या नाकारण्यात आला आहे. हा प्रस्ताव आर्थिक निकषांवर नाकारण्यात आला नसून, धोरणात्मक दृष्ट्या तो फेटाळला आहे. तरीही रूपी सहकारी बॅंकेच्या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. रूपी सहकारी बॅकेचे विलीनीकरण हे व्यापारी बॅंकेमध्ये होईल. याबाबतचा आराखडा रिझर्व्ह बॅंक तयार करेल,`` असा विश्वास राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष  व राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला आहे. 


 अनास्कर यांची नुकतीच सहकार परिषदेवर नियुक्ती झाली असून त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानिमित्त `सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की राज्य सहकारी बॅंक ही शेतीविषयक बॅंक असल्याने आम्हाला रिटेल बॅंकींग  क्षेत्रात परवानगी दिल्यास त्यांचे शेती विषयाकडे दुर्लक्ष होईल, यासाठी नाबार्डकडून रूपी बॅंकेच्या विलिनीकरणाचा  प्रस्ताव नाकारण्यात आला. तरी रूपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांचे पैसे शंभर टक्के मिळतील, मात्र, यासाठी काही कालावधी लागेल. कुणाचे पैसे कधी द्यायचे हे ठरवले जाईल हे टप्प्याटप्प्याने ठरवले जाईल. ठेवीदारांचे पैसे मिळतील असा मला विश्वास आहे.  पीएमसी बॅंकेसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडून नुकताच निर्णय घेत ही बॅंक व्यापारी बॅंकेत विलीन झाली. रूपी बॅंकेचेही असेच केले जाईल. 

या वेळी विचारण्यात आलेल्या राजकीय प्रश्नांवर अनास्कर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. राणे यांचे जवळचे मित्र असूनही तुमची कशी काय निवड ठाकरे यांनी केली, यावर ते म्हणाले, मी राणे यांच्या जवळचा आहे, ठाकरे यांना माहिती आहे. मात्र सहकार क्षेत्रात चांगले काम करणारा कार्यकर्ता म्हणूनही ते मला ओळखतात. त्यामुळे राणे आणि त्यांचा राजकीय संघर्ष असला तरी तो दोघांनीही मला जाणवू दिला नाही. ठाकरे यांनी मला नेमले म्हणून राणे यांनीही नाराजी व्यक्त केली नाही. तसेच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी अंतर जाणवू दिले नाही, असे अनास्कर यांनी सांगितले. 


राणे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षातील कटुता संपविण्याचा सल्ला राणे यांना का देत नाही, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपण मोठ्या लोकांमध्ये काय बोलणार? राजकारणाबद्दल मला फारशी काही माहीती नाही. त्यामुळे ज्या क्षेत्राबद्दल माहिती नाही त्यात आपण सल्ला देऊ नये, मात्र सामान्य नागरिकांप्रमाणे मला सुद्धा या दोघांमध्ये इतके शत्रूत्व नसावे, असे वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

तुम्ही चारही पक्षांचे लाडके कशामुळे आहात ?

फडणवीस सरकारने तुमची राज्य बॅंकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी ती कायम ठेवली. त्यानंतर तुम्हाला सहकार परिषदेचे अध्यक्षपदही देण्यात आले. हे कसे काय झाले. तुम्ही चारही पक्षांचे लाडके कशामुळे आहात, या प्रश्नावर अनास्कर म्हणाले की मी कोणाचा लाडका नाही. माझे काम आणि सहकार क्षेत्रात थोडेफार जे योगदान दिलेले आहे. त्यामुळे माझ्या गुणवत्तेवर ही निवड झाली असावी, असे मला वाटते.

केंद्रातील सहकार खाते अमित शहा यांच्याकडे गेल्याने महाराष्ट्रावर काय परिणाम होईल ? 
केंद्रातील सहकार खाते हे अमित शहा यांच्याकडे गेल्याच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का, असे विचारले असता हे खाते अमित शहा यांच्याकडे गेले नसते तर याबाबत फारशी चर्चा झाली नसती. शहा यांच्याकडे ही जबाबदारी  गेल्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. त्यांचा आक्रमक स्वभाव, प्रसार माध्यमांद्वारे निर्माण झालेले वातावरण असो किंवा सहकार क्षेत्र हे महाराष्ट्रातीमध्ये एका विशिष्ट पक्षाच्या ताब्यात आहे, असा समज केला जातोय म्हणून ही चलबिचल निर्माण झाली असावी, असे मत अनास्कर यांनी व्यक्त केले.


अमित शहा आम्हांला मदत करतील अशी अपेक्षा आहे

अमित शहा हे  बँकिंग क्षेत्रामधूनच पुढे आलेले आहेत. ते आम्हांला मदत करतील अशी अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य या दोघांनी मिळून जर काम केलं तर ती चांगली गोष्ट असून त्यांचे स्वागत आहे. मात्र, एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर सहकार खाते नष्ट केले जात असेल, तर ते योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अनास्कर म्हणाले, ``सहकार क्षेत्र हे कोणत्या एका पक्षाचे नसते. संबंधित संस्थांवर त्या पक्षाच्या विचाराचे माणसे असतात म्हणून त्या संस्थेवर विशिष्ट पक्षाचा स्टॅम्प मारला जातो. यामुळे त्या संस्थांचे नुकसान होते. हा सहकारला लागलेला हा डाग आहे. सहकाराचे भले कोण करतय यापेक्षा सहकाराचे भले झाले हे महत्वाचे आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in