शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारण्याची ‘आशा’ - hope for further improvement in the citys transport system | Politics Marathi News - Sarkarnama

शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारण्याची ‘आशा’

अनिल कांबळे
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

आशालता यांनी सण-उत्सवाचा बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्ताची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली. अपघातांच्या संख्येमध्ये घट आणि ई चालानमध्ये वाढ करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. वाहतूक विभागात पहिल्या महिला अधिकारी म्हणून नव्याने जबाबदारी देण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले. 

नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळायची म्हणजे भारीच किचकट काम. यासाठी तसे कौशल्य असावे लागते. म्हणून पोलीस आयुक्तांकडून वाहतूक विभागात अशाच कर्तबगार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही जबाबदारी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर सोपवली आहे. या कर्तबगार महिला अधिकाऱ्याचे नाव आहे आशालता खापरे. त्यांच्याकडे शहरातील अतिव्यस्त वाहतूक असलेल्या सक्करदरा झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधार होण्याची ‘आशा’ आहे.  

आशालता खापरे या मूळच्या पुण्याच्या आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वीच त्यांची नागपूर शहर पोलीस दलात बदली झाली होती. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आशालता यांची नेमणूक वाहतूक शाखेत केली. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी आशालता यांच्यावर विश्‍वास टाकत अपघात सेलची जबाबदारी दिली. त्यांनी शहरात होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणांचा अभ्यास केला. अपघात स्थळांची माहिती गोळा केली. अपघात ठिकाणांचा सर्व्हे करून ‘ब्लॅक स्पॉट’ निश्‍चीतीकरण केले. 

शहरातील अपघात कमी करण्यासाठी या सर्व्हेचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच त्यांना कोर्ट सेलचीसुद्धा जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी कोर्टात सुरू असलेल्या केसेस आणि दंडात्मक कारवाईत सुधारणा करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. गेल्या १९ ऑगस्टला त्यांच्याकडे सक्करदरा झोनचा पदभार देण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांची बजाजनगर पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी आशालता खापरे यांची नियुक्त करण्यात आली.

आशालता यांनी सण-उत्सवाचा बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्ताची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली. अपघातांच्या संख्येमध्ये घट आणि ई चालानमध्ये वाढ करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. वाहतूक विभागात पहिल्या महिला अधिकारी म्हणून नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.
- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त. 

सक्‍करदरा विभागातील वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्यावर भर देणार. तसेच अपघाताच्या संख्येत घट करणे आणि अवैध वाहतूक रोखण्याला प्राधान्य देण्यात येईल. लोकाभिमुख पोलिसींग करण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी दिलेली जबाबदारी आणि त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणार आहे.
- आशालता खापरे, नवनियुक्त पोलीस निरीक्षक, सक्करदरा झोन.       (Edited By : Atul Mehere) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख