Go to Ayodhya from where you are Balasaheb Thakre Told Arjun Khotkar | Sarkarnama

‘जिथे आहात तिथूनच अयोध्येला निघा‘, बाळासाहेबांचा आदेश आणि आम्ही निघालो..

अर्जुन खोतकर (माजी राज्यमंत्री)
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

कारसेवेच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण अयोध्येला लष्कराचा वेढा पडला, नेत्यांची, कारसेवकांची धरपकड सुरू झाली. देशाच्या कान्याकोपऱ्यात दंगली भडकल्याच्या बातम्या कानावार येऊ लागल्या. रामल्लांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, पण तोपर्यंत सगळीकडे दंगेधोपे सुरू झाले होते. रेल्वेने परतत असतांना झाशीजवळ आमच्या रेल्वे डब्ब्यावर हल्ला झाला, अशी आठवण माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जागवली आहे

औरंगाबाद : अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ मध्ये झालेली कारसेवा ही एक क्रांती होती. मला आठवते माझे नुकतेच लग्न झालेले होते आणि मी मित्रांबरोबर तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. परत असतांनाच ‘जिथे आहात तसेच तिथून अयोध्येकडे निघा‘, असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आला, आणि आम्ही अयोध्येकडे निघालो. जालन्यातील शंभर शिवसैनिकांसोबत आयोध्येला पोहचलो आणि कारसेवेचा भाग झालो. तेव्हाचे अयोध्येतील वातावरण हे न भुतो न भविष्यती असे होते. रामजन्मभूमी मुक्त करण्याचा ध्यास घेऊन कारसेवकांनी जोरदार चढाई करत वादग्रस्त वास्तू अवघ्या काही तासांमध्ये जमीनदोस्त केली.

कारसेवकांचा उत्साह इतका शिगेला पोहचला होता की, केंद्र सरकारने पाठवलेल्या लष्कराच्या हेलीकॉप्टर टेहाळणीला देखील ते जुमानत नव्हते. पण यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकती याची जाणीव आम्हाला होती. त्यामुळे त्यांना आम्ही खाली उतरण्याच्या सूचना करत होतो, पण ते ऐकण्याच्‍या परिस्थितीत नव्हते, त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.

कारसेवा पुर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने अतिरिक्त लष्कराच्या तुकड्या अयोध्येत पाठवल्या, हेलीकॉप्टरमधून टेहाळणी सुरू केली आणि वातावरण तणाव पुर्ण झाले. कारसेवकांनी हेलीकॉप्टरच्या दिशेने दगड, काठ्या हातात येईल ते भिरकावण्यास सुरूवात केली. रस्त्यांवर काटे, दगड, झाडाच्या फांद्या टाकून लष्कराच्या जवानांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न देखील केला.

कारसेवेच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण अयोध्येला लष्कराचा वेढा पडला, नेत्यांची, कारसेवकांची धरपकड सुरू झाली. देशाच्या कान्याकोपऱ्यात दंगली भडकल्याच्या बातम्या कानावार येऊ लागल्या. रामल्लांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, पण तोपर्यंत सगळीकडे दंगेधोपे सुरू झाले होते. रेल्वेने परतत असतांना झाशीजवळ आमच्या रेल्वे डब्ब्यावर हल्ला झाला.

ठिकठिकाणी असे प्रसंग समोर आले, पण या सगळ्याचा सामना करत आम्ही भुसावळपर्यंत पोहचलो. आमच्या प्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक अयोध्येत आले होते, ते सगळे रेल्वेने भुसावळपर्यंत आले आणि तिथून स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करून आपापल्या गावी निघून गेले. अयोध्येतील कारसेवा हा एक इतिहास होता, त्याचे वर्णन शब्दांत करणे खरतर शक्य नाही. अत्यंत भारावलेलं आणि उत्साहाच ते वातावरण होतं.

देशाच्या एका धार्मिक इतिहासाचे साक्षीदार आणि कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी होता आले याचे निश्चितच समाधान आहे. या कारसेवेत अनेक कारसेवकांनी बलिदान देखील दिले. ज्या राम मंदिरासाठी ही कारसेवा झाली त्या मंदिराच्या उभारणीचे भूमीपूजन अयोध्येत होत आहे, ही प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाची बाब आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर अयोध्येतील कारसेवेत शिवसैनिकांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.

Edited By : Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख